मागे वळून पाहिन तेव्हा...

14 Jul 2023 15:30:00


मागे वळून पाहिन तेव्हा...

स्वर्गाहून ही सुंदर आमुची शाळा...

ज्ञान मिळवण्यासाठी येथे मुले ही होती गोळा....

नमस्कार, माझे नाव मानसी सागर ताजणे. सन्माननीय प्राचार्य सर्व शिक्षक आणि व्यापीठावरील सर्व मान्यवरांना आणि माझ्या सर्व बालमित्रांना नमस्कार. मित्रांनो आपण सर्वजण जाणतो की, आपल्या प्राथमिकचे शेवटचे वर्ष. आज आपण येथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी, आपले आभार व्यक्त करते.

या शाळेतील माझे पहिले पाऊल हे किलबिल या वर्गापासून सुरू झाले. शाळा काय असते हे माहीत नव्हते. कारण शांत स्वभावाची, कोणाशीही बोलणारी एकटीच बसणारी अशी इतक्या मुलामध्ये गोंधळून गेली. शाळेची आवड होती, म्हणून याची सवय झाली कारण पूर्वप्राथमिकमधील माझे शिक्षक खूप छान होते. ते मुलांना सांगत, बोलू नका शांत बसा आणि मला सांगत मानसी मुलांबरोबर खेळ, बोल, एकटी बसून राहू नकोस. हळूहळू मी ही मुलांमध्ये मिसळले. असे तीन वर्ष हसतखेळत अभ्यास करत आणि खूप काही शिकत उलटले आणि पूर्वप्राथमिकला निरोप दिला, वाईट वाटले; पण आनंदही होता कारण आता मी पहिलीत जाणार होते. नवीन शिक्षक, नवीन वर्ग, नवीन अभ्यास.

पहिलीमध्ये सुरू झालेला गवस टीचरपासूनचा तो प्रवास छानच झाला. हळूहळू एकएक वर्ग पुढे जात राहिलो, वेगवेगळे शिक्षक, वेगळे अनुभव जसे आमचे मिसाळ सर, पवळे टिचर, घंगाळे टिचर या सर्व शिक्षकांनी आम्हांला छान शिकवले. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मला नेहमी प्रोत्साहन आणि संधी दिली. त्यामुळे मी खूप काही शिकले. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास टिकून ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केला. पहिली ते चौथीमधील अभ्यासाबरोबर केलेली दंगामस्ती अजूनही आठवते. या सर्व अनुभवांमध्ये पाचवीकडे वाटचाल करताना थोडं दडपण, थोडी उत्सुकता. दडपण होते, कारण पहिली ते चौथीमध्ये एकच शिक्षक, पण पाचवीमध्ये वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे शिक्षक. खूप सारा अभ्यास, कडक शिस्त. कारण आम्ही आता मोठे झालो आहोत, याची जाणीव. तसे सर्वच शिक्षक खूपच छान आहेत. पाचवीमध्ये आम्हाला वाठोरे सर, हे आमचे वर्गशिक्षक होते. पाचवी तशीच छान गेली. पण Final Exams आली आणि अचानक 16 मार्च 2020 ला शाळा बंद झाली, कारण म्हणजे कोरोनासारख्या महामारीचे संकट सर्व जगावर आले आणि एक दिवस सात दिवसांचा कडक कर्फ्यु आणि 21 दिवसांचा लॉकडाऊन. सुरुवातीला गंमत वाटली ‌‘चला परीक्षा रद्द झाल्या..' पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसे आम्हांला शाळेची आठवण यायला लागली. ती मस्ती, तो दंगा, मैत्रिणींच्या गप्पा, एकत्र अभ्यास, शिक्षकांचा फळ्यावर चालणारा भरभर खडू आणि फळा सारेच आठवत होत पण करणार काय? सकाळची प्रार्थना, अभ्यास, मधलीसुट्टी, डबा, मधल्या सुट्टीतील खेळ, शिक्षक असेपर्यंत pin drop silence आणि शिक्षक गेले की, पुन्हा आमची दंगामस्ती. या सर्व गोष्टींची, महत्त्वाचे म्हणजे शाळेची आणि शिक्षकांची किंमत कोरोनासारख्या विषाणूने शिकवली. लॉकडाऊनच्या या काळात मी, माझ्या शाळेला पत्र लिहिलेले आणि शाळेला पोहोचले. ते शिक्षणविवेक या मासिकात ते छापूनसुद्धा आले. सहावीमध्ये आमचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यातच वाठोरे सरांची बदली झाली आणि त्यांच्या जागी चौधरी टीचर या गणित शिकवण्यासाठी आल्या. त्याही खूप छान गणित शिकवतात. आमच्या मुख्याध्यापक गवस टीचर यांनी कोरानाच्या काळामध्ये खूप वेगवेगळे उपक्रम ठेवले होते. त्या वेळी आम्ही ते ऑनलाईन करत होतो. त्यांनी ऑनलाईनमध्ये आम्हाला खूपच बिझी ठेवले. त्यामुळे आम्ही जरी शाळेत नसलो तरी, शिक्षण प्रवाहात होतो. अचानक कळाले टीचरची बदली झाली आणि त्यांच्या जागी नवीन मुख्याध्यापक रेश्मा देशपांडे टीचर आल्या आहेत. असे समजले ऑनलाईन लेक्चरमध्ये एकदा. त्यांची भेटही झाली. त्यांना भेटण्याची उत्सुकता होतीच. सातवी ही अशीच जाते की, काय असे वाटू लागले. त्यानंतर देवाला एवढंच सांगितलं की, शाळा सुरू करा. खूप कंटाळा आला ऑनलाईनचा. कधी शाळा बघेन असं झालंय आणि देवाने ऐकले. सातवीमध्ये काही महिन्यांसाठी माझी शाळा सुरू झाली आणि पहिल्या दिवशी आमच्या मुख्याध्यापक रेश्मा देशपांडे यांनी आमचे औक्षण केले आणि सर्व शिक्षकांनी आमचे स्वागत केले. आम्ही वर्गात गेलो आणि आमच्या वर्गशिक्षिका मानकर टीचर वर्गात आल्या आणि पहिले सगळेच दिवस पटकन आठवले. या दोन महिन्यात आम्हाला शाळेने वर्षभरातले खूप काही दिले स्पर्धा, वक्तृत्व, खेळ शिवजयंतीला ठेवलेला डान्स. डान्सच्या वेळी आम्हा सर्वांनाच आमच्या दर वर्षी होणाऱ्या स्नेहसंमेलनाची आठवण झाली सर्वच खूप छान गेले. या दोन महिन्यांमध्ये अभ्यासही खूप छान झाला.

मानकर टीचर यांनी शिकवलेले मराठी आणि त्यांचे मराठी विषयावर असलेले प्रेम. मुरबाडे सरांनी हसतखेळत शिकवलेले गणित. मिसाळ सरांनी शिकवलेले इंग्रजी. जाधव टीचर यांनी शिकवलेला रंगतदार इतिहास आणि मुरबाडे सरांनी शिकवलेले सायन्स, सर्व शिक्षकांनी आमच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला. म्हणूनच मी यावर्षी आदर्श विद्यार्थिनी होण्याचा मान मिळवू शकले. त्यामुळे सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. आठवीच्या वर्गाकडे वाटचाल करताना आम्ही जेव्हा केव्हा मागे वळून पाहू, तेव्हा माझ्या सर्व शिक्षकांची मला खूप आठवण येईल. तसेच माझी छोटी बहीण तुम्हाला माझी सतत आठवण करून देत राहील. ती माझ्या स्वभावाच्या विरुद्धच आहे. खूप मस्ती करणारी, बडबड करणारी, तिलाही तुमची साथ अशीच राहू द्या.

धन्यवाद!

- मानसी ताजणे, 8 वी,

विवेकानंद संकुल, सानपाडा

Powered By Sangraha 9.0