
8 मार्च महिला दिन, त्यात रविवारचा दिवस. आज आमची मज्जाच मज्जा. आम्ही सर्वजण दिवसभर खूप फिरलो आणि मज्जा केली. आता संध्याकाळचे सात वाजले होते, सर्वजण खूप थकले होते. घरी आलो खरं पण आत्ता स्वयंपाक करायचा म्हणजे आई आणखीनच थकणार. तेवढ्यात बाबांना एक युक्ती सुचली. ते म्हणाले आज सगळा स्वयंपाक मी करणार. हे ऐकताच आम्ही सर्वजण चकीत झालो. पण तो बाबांचा निर्णय होता. आम्ही नाही कसे म्हणणार. नाईलाजाने हो म्हणावे लागले. मग काय होणार, नको तेच झाले. बाबा स्वयंपाकघरात गेले अन् मी आणि आई लपून मात्र सर्वकाही पाहत होतो. आधी काय करावे हेच त्यांना समजेना. मग पटकन मोबाईल काढून त्यांनी रेसिपी पाहून घेतली. आता स्वयंपाक करायला त्यांनी छान पण सुरुवात केली. सगळं चाललं होतं. पण आता खरी मज्जा येणार होती, कारण ते खीर करत होते आणि मोबाईलमधल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले पिठीसाखर टाका. आता त्यांना काय कळणार की, मीठ आणि पिठीसाखर कशी दिसते? त्यांनी चूकून साखर ऐवजी मीठ टाकलं आणि खीर तयार केली. आम्हांलाही वाटले की, त्यांनी साखरंच टाकली आहे. पण जेव्हा खाण्याची वेळ आली तेव्हा आईला कळलं की, त्या खीरीत साखरे ऐवजी मीठ आहे. पण तिने नाटक केलं आणि खीर छान झाली आहे असे बाबांना सांगितले. आम्ही सर्वांनी ही नाटक केलं खरं पण बाबांना ते समजले नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो मात्र स्पष्ट दिसत होता.
- प्रांजल चव्हाण, 6 वी,
कन्याशाळा, वाई