अक्का नव्हे अन्नपूर्णा!

20 Jul 2023 17:01:40

अक्का नव्हे अन्नपूर्णा!

   पैठण येथील सुप्रसिद्ध हनुमान हॉटेलच्या सर्वेसर्वा म्हणजे अक्का.

अक्का म्हणजे सुमनबाई बबनराव मारवाडी. त्यांचा जन्म साधारण 1945 मधला पारतंत्र्यातला. अक्कांचे शिक्षण चौथी पास. तसे पाहता अक्कांच्या माहेरी सधनता होती अन्‌‍ सासरची जरा बेताचीच परिस्थिती होती. अशा परिस्थितीतच अक्कांचा विवाह 1 मार्च 1960 रोजी शिक्षक असलेल्या बबनराव यांच्यासोबत झाला. तोसुद्धा वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी झाला.

हनुमान हॉटेलची सुरुवात अक्कांचे सासरे सीताराम सोनाजी मारवाडी यांनी 1972 मध्ये केली. हॉटेलची सुरुवात पैठण येथे बारदाना (पोत्यांचा अडोसा) बांधलेल्या आणि शेणाने सारवलेल्या स्थितीत सुरुवात झाली. अक्कांचे सासरे, पती आणि कुटुंबाने अक्कांवर जबाबदारी टाकण्याचे ठरवले, तेदेखील वयाच्या 21 व्या वर्षीच्या दरम्यान. पैठणसारख्या तीर्थक्षेत्री मोठ्या संख्येने भाविक भक्त येत. सोबतच उद्योग, व्यवसाय आणि नोकरी या निमित्ताने एकट्याने असणाऱ्यांना जेवणाची व्यवस्था महत्त्वाची होती. या कालावधीत अक्कांच्या हनुमान हॉटेलने ही व्यवस्था चोख सांभाळली. या कालावधीत अक्का 200 ते 250 लोकांचा स्वयंपाक करायच्या आणि तोही ताजा. यामध्ये अक्का 500 ते 600 पोळ्या आणि पाच प्रकारच्या भाज्या दोन वेळ करायच्या. ज्या कालावधीत हॉटेल ही संकल्पनाच नव्हती, त्या वेळी उत्तम असे नाव हॉटेल हनुमानने कमावले. हे फक्त अक्कांच्या हाताची चव आणि अक्कांना असलेली अन्नपूर्णा प्रसन्न यामुळेच.

आज सुद्धा अक्कांच्या हातची वडा आमटी, मटकीची भाजी आणि शेंगादाणा बेसन विशेष प्रसिद्ध आहे बरं का! सणावाराला प्रत्येक ग्राहकास घरची आठवण येते, पण नाईलाज असतो. त्याला बाहेर जेवण करावे लागते, मात्र ही गोष्ट अक्कांनी हेरत ही मायमाऊली सर्वांना सणावाराला पुरणाची पोळी आणि गोड जेवण आवर्जून देत असत. अक्काच्या हातचा स्वयंपाक म्हणजे सात्विक जेवण. जसे की सत्यनारायणाच्या पूजेचा जणू काही प्रसादच. आज चटपटीत जेवणाकडे सर्व आकर्षित होतात. मात्र अक्कांचे जेवण म्हणजे खऱ्या अर्थाने घरगुती जेवण. ज्याच्या घरी कोणी नाही, गावी गेले किंवा एकटाच राहतो, अशांच्या जेवणाची व्यवस्था अक्का करतात. विनोदाने पैठण शहरात असेही म्हटले जात आज हनुमान काय? म्हणजे एकटेच आहात आणि अक्काच्या हनुमान हॉटेलवरती हनुमानाप्रमाणे जेवणाची व्यवस्था आहे वाटतं. यातून मतितार्थ असा आहे की, पोटभर जेवणाची व्यवस्था असलेले ठिकाण. मराठीत अक्का म्हणजे मोठी बहीण. अशा अक्कांकडे जेवणाची व्यवस्था म्हणजे अक्कांचे हनुमान हॉटेल. अक्कांच्या 3 मुली आणि 1 सून हे सर्व सरकारी नोकरी करतात. 1 मुलगा हॉटेल सांभाळतो आणि आर्य चाणक्य शाळेचे संचालकदेखील आहेत. 9 नातवंडे उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित आहेत. 2006 ला त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतरही त्यांनी कष्टाच्या आणि हिंमतीने कुटूंब आणि हॉटेल सांभाळले.

अक्कांचा दिनक्रम पहाटे 4 वाजता सुरू होतो. दारात सडा-रांगोळी घराची साफसफाई करण्याचं काम त्या नित्यनियमाने करतात. यानंतर स्नान वगैरे करून, त्या 5 वाजता संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जातात. सोबतच एक विठ्ठल मंदिरात तेथील पूजाअर्चा सर्व काही त्या पूर्ण करून साधारण 8 वाजता त्या त्यांच्या कामाला सुरुवात करतात. यानंतर आवश्यक असणारी सर्व काम त्या वेळेत पूर्ण करतात. 10 वाजता तर उत्तम प्रकारे जेवणाचे ताट तयार ठेवतात. पहाटे 4 वाजता उठलेल्या अक्का रात्री 10 वाजेपर्यंत निरंतर काम करत असतात. सर्वात विशेष म्हणजे अक्का दुपारच्या वेळेमध्ये देखील आराम करत नाहीत. त्यांच्यामध्ये असलेली ही ऊर्जा कुठून आली तर ही खरं तर दैवी देणगीच म्हणावी लागेल. आज अक्कांचे वय 77 वर्षे पूर्ण आहे. तरीदेखील त्याच उर्जेने, त्याच तडफदार पद्धतीने, अक्का काम करतात जणू काही एखाद्या तरुण आणि तरूणींना लाजवेल असे काम अक्का करत असतात. स्वयंपाक कामापलीकडे देखील विचार केला तर, चौथी शिकलेल्या अक्का विविध धार्मिक ग्रंथ वाचतात. त्यामध्ये ज्ञानेश्वरी, श्रीपाद वल्लभ चरित्र, विष्णुपुराण अशा विविध ग्रंथांचे वाचन त्यांनी केले आहे. वाचन करून ग्रंथांची रास नाही रचली, तर वाचनाची आवड असणाऱ्यांना स्वतःकडील ग्रंथ भेट केलेले आहेत. येथे शिक्षणविवेकचे वाचन करणाऱ्या सर्व वाचकांना अक्कांचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा हे मात्र खरे.

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आर्य चाणक्य विद्यामंदिर पैठण, येथे संचालक असल्याने शिवाजी मारवाडी यांच्या मातोश्री म्हणजे अक्का, अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आपल्या मुलाच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. हे पाहण्यासाठी अक्का स्वतः उपस्थित होत्या. ते फक्त देशप्रेम आणि मुलावर असलेले प्रेम या दोघांनीही अक्कांना शाळेत आणले होते. उपस्थित मान्यवरांसोबत अक्का बसलेल्या होत्या तेव्हा, अक्कांनी त्यांच्या बालपणी असलेली कविता 1880 विद्यार्थ्यांसमोर अतिशय उत्तम पद्धतीने सादर केली. यामध्ये अक्कांचा आत्मविश्वास सभाधीटपणा आणि स्मरणशक्ती आम्ही अनुभवली.

तसा मारवाडी परिवाराचा परिचय हा आमच्या वडिलांपासून जो की, 1980ला नोकरीच्या निमित्ताने पैठणमध्ये आले असता. जेवणाची व्यवस्था केली ती अक्कांनी. तुम्ही आज आमच्या शिवाजीचे पाहुणे आहात, आमच्या शिवाजीचे गुरुजी आहात, हा मनाचा मोठेपणा देत प्रथम वेळी पैसे घेणे नाकारले. अक्कानी व्यवहार नाही तर जिव्हाळा महत्त्वाचा मानला. याच जिव्हाळ्यातूनच आर्य चाणक्य विद्यामंदिराचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी आणि आम्ही शिक्षक देखील प्रसंगानुसार अक्कांकडे हक्काने घरचे जेवण करायला जातो.

आज मारवाडी परिवाराची तिसरी पिढी ‌‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म' करते आहे, ते फक्त अक्कांना अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे म्हणूनच...

- आशुतोष पानगे, सहशिक्षक,

आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठण

Powered By Sangraha 9.0