स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण देशभर ‘शिक्षकदिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. राधाकृष्णन हे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याअगोदर एक व्यासंगी आदर्श शिक्षक होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर विभूतींनी भारतीय संस्कृतीच्या महानतेचे गमक सुसंस्कारात आहे, हे सर्व जगाला दाखवून दिले. समाजात शिक्षकांबद्दल आदराची भावना असते, मात्र ती शिक्षकांनी आपल्या नम्रतेतून, सद्वर्तनातून कायम टिकवली पाहिजे. ‘विद्यार्थी हेच माझे दैवत' मानले पाहिजे. घेण्यापेक्षा देण्यात सर्वश्रेष्ठ आनंद सामावलेला असतो, हे गृहीत मानून विद्यादान सतत निष्ठापूर्वक केले पाहिजे. जग झपाट्याने बदलत आहे. ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी स्वतःला बदलायला हवे. स्वतःमध्ये बदल करून शाळेतील वातावरण आनंददायी ठेवायला हवे, कारण मुले अशाच वातावरणात शिकू शकतात, जिथे त्यांच्या विचारांना प्रतिसाद दिला जातो. त्यातून त्यांना शिकण्याचा आनंद आणि समाधान मिळते. विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा विकास करणे आवश्यक असते, कारण शिकवणे म्हणजे केवळ देणे नसून, घेण्यास समर्थ करणे होय. असा समर्थ विद्यार्थी मग आपल्या गुरूंना सांगेल की, ‘पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा|'
प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विशेषत: आपल्या शाळेतील छोटी छोटी मुलं कशी शिकतात, कशामुळे शिकत नाहीत, कोणतं शिकण त्यांच्या आवडीचं आहे, या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने अध्यापन करतात, तेव्हा त्यांच्याकडे प्रयोग, कृती, खेळ असे विविध मार्ग असतात. खेळ आणि कृती अध्यापनाची प्रक्रिया अधिक रुचिपूर्ण आणि परिणामकारक करतात.
एकाच कुटुंबात वाढणारी भावंड काय किंवा शाळेत शिकणारी मुलं काय, सर्वार्थाने एकसारखी नसतात. काही जमिनीत टाकलेला एक दाणा जसं पसाभर धान्य आपल्याला देतो, तसं काही मुलं शिकवलेल्या प्रत्येक बाबीच फुलतं, फळतं आणि बहरतं रूप बघण्याचं सुखसमाधान देतात. फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवतात असं नाही, तर विद्यार्थ्यांकडूनही शिक्षकांना बरंच काही शिकायला मिळतं. मुलांना सतत काहीतरी नवं हवं असतं. विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवताना खेळाचा उपयोग का केला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर सहजपणे मिळते की, आमच्या प्रशिक्षण काळात आम्हांला असे खेळ कोणी शिकवले नाहीत. स्वतःमध्ये बदल करण्याची ज्या व्यक्तीची तयारी नसते, त्या व्यक्ती बहुतेक अशीच कारणे सांगतात. पण जीवन जगताना, प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवली जाते की, आपण शिकतो? आपल्या वर्गातील मुलं शिकण्यासाठी उत्सुक असावीत आणि शिकताना त्यांना आनंद वाटावा, ही शिक्षकाच्या व्यवसायातील आत्यंतिक गरज ज्या व्यक्तीला भिडेल, ती व्यक्ती अनेकविध उपक्रमांचा आणि खेळांचा उपयोग करता करता शिक्षक आणि मुलं या दोघांना आनंद तर मिळेलच आणि त्याबरोबर त्यांचं पोषणही होईल. नव नवं शोधून त्याची चपखल कार्यवाही करणं आणि त्या कार्यवाहीतून अपेक्षित उद्दिष्ट गाठणं हा शिक्षकाला मिळणारा एक महत्त्वपूर्ण आनंद आहे.
प्राथमिक स्तरावरील मुलांना जो शिक्षक विद्येबद्दल आणि स्वतःबद्दल लळा उत्पन्न करू शकेल, तो आपल्या व्यवसायात यशस्वी झाला असं म्हणता येईल. प्रशिक्षण काळात याबद्दलची गुरूकिल्ली मिळाली नसली, म्हणून काय झालं?
आज विद्यार्थ्यांसमोर खूप आव्हानं आहेत. स्पर्धेच्या या युगात टिकण्यासाठी शर्यत अटळ आहे. या शर्यतीत कुठपर्यंत, किती धावायचे हे सांगणारा आज कोणीतरी हवा आहे. मानसिक ताणतणावाच्या या वातावरणात, चेहऱ्यावरच्या आणि चेहऱ्यामागे लपलेल्या भावभावनांचा शोध घेणारे, विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करणारे कोणी हवे आहे. उज्ज्वल भविष्याच्या योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या अनेक संधी उलगडून दाखवणारे आश्वासक असे कोणी हवे आहे. या साऱ्या अपेक्षा घर कधी पूर्ण करू शकत नाही. म्हणून अपेक्षांचे ओझे शिक्षकांवर टाकायला पालक उत्सुक असतात. पण ही जबाबदारी शिक्षक स्वेच्छेने स्वीकारताना आज दिसत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, दुर्गम भागात, वाडी-वस्तीवर, तांड्यावर मुलांच्या गुणवत्तेसाठी धडपडणारे, नव्या विचारप्रवाहांनी प्रेरित झालेले खूप शिक्षक तळमळीने काम करीत आहेत. प्रत्येक शिक्षक नवीन शैक्षणिक साधने तयार करत आहेत. कोणी विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारावे यासाठी धडपडत आहे, तर शैक्षणिक प्रदर्शने, विज्ञान मेळावे, क्षेत्रभेटी, खेळ, गोष्टी कृतियुक्त अध्यापन, सांस्कृतिक कार्यक्रम, टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणे असे कितीतरी नवनवीन शैक्षणिक प्रयोग करीत आहेत. खरी गरज आहे ती तळमळीने काम करणाऱ्या, धडपडणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढवण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची. शिक्षण हे शास्त्र आहे आणि कलाही. हे सुंदर रितीने मांडणाऱ्या, माझ्या सर्व शिक्षकांना व त्यांच्या धडपडींना सलाम!
- स्मिता माळवदकर, सहशिक्षिका,
नू.म.वि. मराठी शाळा, सोलापूर