मला काय हवंय? याकडे आजकाल कुणी लक्षच देत नाही. नुसता वैताग आला आहे.
शाळेतून घरी आले अन् हात पाय धुवून जरा कुठे टि.व्ही.वर कार्टून बघायला लागले, तर आजोबा हजर. आजोबा म्हणजे शिस्तीचा बडगा, शुद्ध भाषा, लाड कमी आणि शिस्तच जास्त. आले आणि म्हणाले, ‘पुरे झालं आता हे व्यंगचित्र पाहणं. मला बातम्या पाहायच्या आहेत.’ मनातच मी म्हणाले, ‘काय असतं हो या बातम्यांमध्ये? तेच ते राजकारण आणि हवामानाचे अंदाज. जो अंदाज सांगतात त्याच्या उलटच नेहमी होतं. म्हणजे बघा परवा सांगितले उद्या पाऊस पडणार आहे. कधी नाही ते या बातम्या ऐकल्या आणि शाळेत जाताना आठवणीने रेनकोट घेऊन गेले तर पाऊस पडला नाही. मग पाऊस पडणार नाही म्हणून रेनकोट दप्तरातून काढून ठेवला आणि नेमका आज बरोबर शाळेतून घरी येतानाच पाऊस पडला. आणि काय तर म्हणे ते राजकारण... काय असतं हो या राजकारणात? एक सरकार आणि दुसरे विरोधी पक्ष. अहो, हे सगळे राजकारणी असे असतात. कोणी उठून कधी कोणत्या पक्षात जातात आणि त्यानंतर विरोधी पक्ष हे सरकार होतं तर सरकार विरोधी पक्ष होतं. कोण सरकार अन् कोण विरोधी सगळाच नुसता गोंधळ. मला तर यातलं काहीच कळत नाही. पण करणार काय? मला काय हवंय याकडे कुणीच लक्ष देत नाही. सगळे आपापल्या कामात दंग. आणि बरं का माझी आई म्हणजे शिस्तीचा महापूर. सारखं हे घेऊ नकोस, त्याला हात लावू नकोस, ते करू नकोस. सतत अशा सूचना करते. तिच्याकडे गेले आणि म्हणाले आई मला जरा मोबाईल दे ना प्लीज! अगं नाही गेम खेळायला नकोय. मला शाळेत अंतराळवीर कल्पना चावला यांची माहिती मिळवायला सांगितले आहे. पण तरीही ती नाहीच म्हणाली. पण आता मीही मला जे हवंय ते मिळविणारच होते. खूप हट्ट केल्यावर म्हणाली, ‘घे बाई घे, पण डोक्याला ताप देऊ नकोस माझ्या. मोबाईल घेताना मनात विचार आला मी कुठे आईला ताप दिला? फक्त मला खरंच जे हवंय ते मागितलं. उलट या घरात जे मला पाहिजे ते काहीच कोणी देत नाही. म्हणून कायम माझ्याच डोक्याला सगळ्यांचा ताप होतो. असो.’
मी माहिती बघण्यासाठी गुगल ओपन केलं तर आमचे दादासाहेब आलेच. हा अगदी आजोबांच्या वळणावर गेला आहे.
बोलणं तस्संच. वागण तस्संच. मला म्हणतो कसा, ‘रमे तू आधुनिक साधनांचा वापर अभ्यासासाठी का करतेस? हे चुकीचे आहे. अगं अभ्यास करावा तर तो वाचनातून, पाठांतरातून.’ असं म्हणत तो मोबाईल घेऊन निघूनही गेला. आता माझं काय? आईला सांगितले तर ती लक्ष्यही देणार नाही. मग वेळ वाया घालवण्यापेक्षा बाबांनी आणलेली सापशिडी माझ्या छोट्या बहिणीसोबत खेळायला लागले. माझी ही बहीण खूप रडकी आहे. ती सापशिडीमध्ये हरली आणि मी जिंकले तर बाई भोंगा पसरून रडायला लागल्या. मग तिला शांत करून झोपवलं.
हे अस्संच होत नेहमी. काय करावं काही कळत नाही. नाही म्हणायला अगदी गरजेची, महत्त्वाची गोष्ट असेल तर सगळे जण ती लगेच देतातही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील सर्वच माझ्यावर खूप खूप प्रेम करतात आणि मीसुद्धा सर्वांवर तितकेच प्रेम करते. म्हणूनच नेहमी म्हणते ख ङजतए चध ऋअचखङध.
- रमा शंकर शिंदे.
महिलाश्रम हायस्कूल