‘अगं पल्लवी, मुलांना मराठी माध्यमात शिकण्यासाठी घातलंस?’ असा प्रश्न अनेक वेळा विचारणारे चेहरे एक तर आश्चर्यकारक असतात, किंबहुना कपाळावर आठ्या आणि भुवया उंचावणारे असतात. पण मी माझ्या मतावर ठाम होते आणि आहे. मातृभाषेतून शिक्षण का? असा विचार करताना, मी माझ्या मुलांच्या शंका, त्यांना पडलेले प्रश्न आणि मूलभूत संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे समजावू शकते, असं मला वाटतं.
इतिहास-भूगोल म्हणण्याची जी मजा आहे ती सोशल सायन्समध्ये नाही. किती तरी पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करतात, प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. प्रवेश मिळाला की आनंदी-आनंद.
कारण काय? तर पुढच्या भविष्याच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. नोकरीसाठी महत्त्वाचे आहे, वगैरे वगैरे. नर्सरीपासून क्लास. कारण एक तर आईला कसं आणि काय शिकवायचं हे कळत नसतं, दुसरं वेळ नसतो. कारण नोकरी, काम या सगळ्यात त्या अजाण बालकांना प्रारंभी संकल्पनाच पूर्ण समजलेल्या नसतात. मग हे सगळं कशासाठी?
माझा मराठी माध्यम शाळेत पहिली इयत्तेत शिकणारा श्लोक मला जेव्हा प्रश्न विचारतो, ‘आई ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून चांगदेवाचे गर्वहरण केले म्हणजे काय गं? ती भिंत कशी चालली असेल? दाणपट्टा म्हणजे काय? बाजीप्रभू देशपांडे दाणपट्टा कसा चालवत होते?’ असे प्रश्न त्याला पडतात, तेव्हा मला सार्थ अभिमान वाटतो की त्यांचात आपली मराठी संस्कृती रुजते आहे.
समर्थांचे मनाचे श्लोक, मराठीत असलेले साहित्य, वाङ्मय याचा अभ्यास कधी आणि कोणी करायचा? मराठी माध्यमात शिकणार्या माझ्या मुलांना हिंदी पिक्चरच्या गाण्यांवर नाचता येत नाही. पण त्यांना अनेक बडबडगीते, मराठी गोष्टी सांगता येतात. याचे मला समाधान आहे.
ओवी आणि श्लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मराठी माध्यम शाळा यमुनानगर शाखेत पहिली इयत्तेत शिकत आहे. काल खेळताना दोघेही शाळेत शिकवलेली कविता म्हणत होते. मला खूप आनंद झाला.
कारण माझं बालपण माझ्यासमोर उभे राहिले. मलाही होती वसंत बापट यांची कविता पहिली इयत्तेत होती. चित्र सह कविता डोळ्यांसमोर उभी राहिली.
छोटेसे बहीण भाऊ,
उद्याला मोठाले होऊ,
उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ
खरंच आता पाठ्यपुस्तकात म - मगरीच्या ऐवजी म - मराठीचा, म - महाराष्ट्राचा, म - मातृभाषेचा म्हणण्याची गरज आहे.
- पल्लवी फडणीस, पालक,
शिक्षण प्रसारक मंडळींची मराठी माध्यम शाळा, निगडी