झाड

झाड

शिक्षण विवेक    28-Jul-2023
Total Views |

झाड
कितीही आला वादळ वारा
तरी झाड कधी घाबरतं का?
कुर्‍हाडीचे घाव झाले तरी
उभं रहाणं सोडतं का?
एकटंच असलं झाड
तरी पानांना ते धरून असतं पिकलं एखादं पान ही
शेवटपर्यंत जपत असतं...
त्याच्यासारखं उभं राहणं
आपल्याला तरी जमेल का?
इतक्या पानांचा भार सांगा
आपल्याला तरी पेलवेल का?
पक्ष्यांसाठी झाड म्हणजे
आजोबां सारखं असतं
अंगाखांद्यावर खेळण्यासाठी हक्काचं
असं गाव असतं...
सावली देताना झाड कधी
जात पात पहात नाही ...
कितीही असल ऊन तरी
सावली देणं सोडत नाही...
झाड होणं हे काही साध सोपं गणित नाही ...
इतरांसाठी जगत रहाणं
कुणालाही जमत नाही...
आपणही जगता जगता
झाड व्हायला हवं ..!
कुणासाठी सावली तर
कुणासाठी आधार व्हायला हवं ...!
 
- सुनित कदम