देशभक्ती म्हणजे काय?

17 Aug 2023 17:13:41


देशभक्ती म्हणजे काय?

ज्या गोष्टीचे महत्त्व व्यक्तिगत स्वार्थापेक्षा आपल्याला अधिक जाणवते, अशा गोष्टीप्रती आपण आपली भक्ती व्यक्त करत असतो. देव असो वा देश असो, भक्ती हा आपल्या देशवासीयांसाठी एक जीवनाचा मार्ग ठरलेला आहे. त्यामुळे खरी देशभक्ती ही संपूर्ण देशाचा आणि येथील नागरिकांचा विकास घडवून आणू शकते.एका विशिष्ट अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक आधारावर उभा असलेला आपला भारत देश आणि त्याबद्दल आपल्याला वाटणारा कमालीचा आदर आणि अशा सांस्कृतिक मूल्यांच्या वृद्धीसाठी देशाप्रती केली जाणारी कृती म्हणजेच प्रत्येक नागरिकासाठी देशभक्ती आहे. देश हा फक्त सीमेवर निर्धारित होता, तेथील लोकांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या कर्तृत्वावरही निर्धारित केला गेला पाहिजे. येथील नागरीकांसाठी जगण्यास एक स्वस्थ सामाजिक वातावरण निर्मिती करणे म्हणजेच देशभक्ती होय. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपला देश एकत्र आला होता, तेव्हा जी देशभक्ती जाणवली होती त्या पद्धतीची देशभक्ती सध्या गरजेची नाही. आपल्याला कोणाशी लढायचे नाही, तर देशातील व्यक्ती सक्षम करून त्यांना देश विकासात जोडायचे आहे. भारतातील संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ती संस्कृती जपून आत्मिक उन्नती साधणे हे भारताचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. त्या संस्कृतीचे पाईक म्हणून प्रत्येक पिढीत कायदे प्रणालीवर जबाबदारी असते. अशा प्रणालीनुसार प्रत्येक व्यक्तीला देशाबद्दल असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली गेली पाहिजे. देशाचे नागरिक घडवताना लहानपणापासून देशाबद्दल आत्मीयता जागृत करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण, कला-क्रीडा, व्यवसाय, राजकारण अशा सर्व स्तरांवर देशाला प्रथम प्राधन्य असायला हवे. त्यातूनच प्रत्येक पिढी प्रेरणा प्राप्त करेल आणि जीवनाची दिशा ही देशाप्रती ठरवू शकेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्य शत्रूंचे आक्रमण होऊ नये आणि सामाजिक स्थैर्य लाभावे म्हणून भारतात सुरक्षा प्रणाली खूपच मजबूत करण्यात आली. त्यामुळे आज देशभक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा यंत्रणेत सामील होऊन देशसेवा करणे असाही एक अर्थ तयार झालेला आहे. देश हा तेथील व्यक्तींनी मोठा होत असतो. त्यामुळे प्रत्येक बालक, तरुण हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असले पाहिजेत. व्यक्तीमध्ये नैतिक मूल्यांची वाढ होत गेली, तर देशभक्ती काही वेगळी शिकवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे साक्षर भारताची आज खूपच आवश्यकता आहे. देशभक्ती ही फक्त स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनालाच दाखवता प्रत्येक क्षणी ती आपल्या कृतीतून दिसायला हवी. जगण्याला व्यक्तिगत उद्देश असला तरी सामूहिक स्तरावर एक उदात्त हेतू म्हणून आपण आपल्या देशासाठी छोटे-मोठे कार्य करू शकतो. उज्ज्वल आणि विकसित भारताच्या निर्माणासाठी सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जोपासना करत, येथील प्रत्येक नागरिकाने व्यक्तिगत स्वातंत्र्य अनुभवले पाहिजे, अशी दूरदृष्टी ठेवून आपण आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीत देशभक्ती जागृत करायला हवी. अशा प्रगत देशाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने सर्व देशवासीय अंतर्गत कलह मिटवून देशाच्या विकासासाठी निर्मळ मनाने आणि देशभक्ती भावनेने एकत्र आले पाहिजेत. तेव्हा त्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या पद्धतीला खरी देशभक्ती म्हणता येईल. भारत माता, भारत माता,भारत माझ्या देशा,अनेक नावे, अनेक रंग,अनेक रूपरेषा!-

- अंतरा सावंत, 8वी,

सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे

Powered By Sangraha 9.0