मी आणि ताईने केला स्वयंपाक !

26 Aug 2023 11:16:58


मी आणि ताईने केला स्वयंपाक !

आज मम्मीचा बड्डे आणि 26 जानेवारी. आज आम्ही फिरायला गेलो होतो. मी, मम्मी, बाबा आणि ताई. आम्ही खूप फिरलो, खूप मज्जा केली, खूप शॉपिंग केली. संध्याकाळी घरी आलो आणि सगळे खूप थकलो होतो. सगळ्यांच जणांना खूप भूक लागली होती. मग मी आणि ताईने जेवण करायचे ठरवले. आई म्हणाली, ‌‘अगं पण तुम्हाला दोघींना नाही जमणार.' पण आम्ही काय ऐकणार! आम्ही शेवटी किचनमध्ये गेलोच. आम्ही आईला स्वयंपाक करताना पाहिले होते, त्यामुळे थोडफार आठवत होतं. आम्ही डाळभात करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही दोन-चार डबे उचकटले आणि आम्हांला अनेक प्रकारच्या डाळी दिसल्या. आम्ही त्यातली एक डाळ स्वच्छ धुतली आणि ताईने डाळ कुकरमधे शिजत घातली. डाळ घातल्यानंतर आम्ही भात करायला डबे उचकटले, पण चार-पाच डबे उचकटल्यानंतर त्यातल्या डब्यातले तांदूळ घेतले आणि नीट धुऊन ठेवले आणि डाळ पण शिजली होती. आता थोडावेळ कुकर थंड होऊ दिला आणि परत त्यात भात शिजत घातला. नंतर आम्हांला कढई हवी होती. पण ती काही सापडेना. मग खूप शोधून शेवटी एकदाची सापडली. मग गॅस पेटवला आणि त्यावर कढई ठेवली. त्यात ताईने जे जे आठवेल ते ते सगळे घातले. मी तर नुसतीच बघत उभी राहिले होते. त्या कढईत ताईने काय-काय घातले होते माहिती आहे? जीरे, मोहरी, कढीपत्ता. म्हणून वास छान येत होता आणि त्यात जे सगळं तिने आईचे बघून बघून घातलं होतं, त्यात तिने शिजलेली डाळ घालून मीठ घातलं. आता भात शिजला होता. डाळ फक्त कढवायची होती. ती कढेपर्यंत आम्ही दोघी फ्रिज उचकटून मस्त आईस्क्रिम खात बसलो होतो. डाळ कढली आणि जेवण तयार! मग मस्त सलाड कापून, लोणचं घेऊन जेवायला बसलो. आजचा हा गमतीजमतींचा दिवस आमच्या कायम लक्षात राहील. आज आईला खूप बरं वाटलं! तिच्या वाढदिवसाला तिला खूप छान गिफ्ट मिळालं आणि आम्हांलाही खूप आनंद झाला!

धन्यवाद

- श्रद्धा जाधव, 6 वी

कन्याशाळा, वाई

Powered By Sangraha 9.0