'‘आबा, या फोटोमधल्या आजी कोण आहेत?’', बिल्वानं विचारले.
आबा : माझी आई
बिल्वा : कुठे गेली आहे आजी?
आबा : देवाघरी, देवाघरी गेलेली माणसं परत येत नाहीत.
बिल्वा : नाही... नाही येतात की,
तू लहान हो, तुझी आई परत भेटेल..
साडेतीन वर्षाच्या बिल्वाला मृत्यूचा अर्थ समजावून सांगितला तरी सभोवताली असलेली माणसं, मित्र-मैत्रिणी, मोबाईल, टि.व्ही. यावर येता-जाता दिसेल, समजेल ते संदर्भ घेऊन, स्वतःचा मेंदू वापरून ती हा अर्थ लावते. टि.व्ही. किंवा मोबाईलवरही जादूची छडी फिरली की माणूस छोटा-मोठा होतो. जिवंत राहतो किंवा मरून जातो. जिवंतपणापेक्षा लहान-मोठं होण्याच्या किंवा मरणाच्या संदर्भाशी आताची डिजिटल पिढी वेगाने “रिलेट” झाली आहे. ते चूक की बरोबर? यापेक्षा या सगळ्याची उत्तरं शोधत त्यासोबत प्रवाही राहणं गरजेच आहे. थोडक्यात माध्यमांशी आपला भावनांक (एट) जोडला गेला आहे हे मान्य करून तीन ते सहा वर्षांचा लहान बालमित्रांच्या वाढीचा काळ हा अत्यंत रमणीय असू शकतो. आहेच.
पावनखिंड पाहताना, शत्रू कोण असतात? त्यांना का मारतात? शिवाजी महाराजच का बरं मारतात? या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे मुलांचं कुतूहल वाढवतात. या प्रश्नांना व्यवहारी उत्तरं देऊन बालमन कधीच तिथे थांबत नाही. पुढेही प्रश्न चालूच राहतात आणि त्या प्रत्येक प्रश्नामागे जगात नव्याने जन्माला आलेल्या जीवाचं ‘कुतूहल’ खोल खोल आहे म्हणून प्रत्येक पात्राचा म्हणजेच शिवाजी महाराजांचा पेहराव, मेकअप, अॅक्शन, सीन्स्, तोफा, शूटिंग याबद्दल मुलांना माहिती देऊच, पण इतिहासाचेही संदर्भ अभ्यासून सांगू. आपण पुन्हा लहान होतो. एका क्लिकवर आपणही नवी माहिती पाहतो आणि मुलांसोबत काहीतरी नवीन शिकतो. त्यांचं यासोबत वाढत जाणारं कुतूहल आणि जिज्ञासा माध्यमांची जाण घेऊन येणारं आहे. थोडक्यात शाळांसोबत आपली इथेही इयत्ता वाढत आहे.
खरं-खोटं, खरं असलेलं खोट (आभासी), माहितीपूर्ण, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष याची संगड घालताना आपली धांदल उडते आहे, असं वाटतही. पण हे सोप्या पद्धतीने आपण करत आहोत. रोज एक गाणं ऑडिओ रूपात मुलांना अॅलेक्सावर ऐकवू. एक बडबडगीत मोबाईलवर दाखवू. गाण्यांमधले मुलांना वेगळे वाटणारे शब्द त्यांना विचारायचे, ते लिहून काढायचे, त्यांचे त्यांना समजतील अशा प्रकारे अर्थ सांगायचे आणि ते गाणं परत ऐकायचे. अॅलेक्साला गाणं लावायला सांगतानाची सूचना मूलं आपण न शिकवताही शिकतात. माझी लेक नऊ महिन्यांची असताना अलेक्साला अक्का म्हणून ओरडायची. मला खूप हसू यायचं. थोडक्यात घरातलं कोणतंही माहिती देणार उपकरण ही पिढी आत्मविश्वासाने हाताळते आहे, पाहते आहे, शिकते आहे. हे वर सगळंच खरं खरं वाटण्याचं. त्या वयाला वाढायला वेळ जावा लागतोच, पण माध्यमांची समज आपल्या बोटाला धरून वाढतेय, प्रत्यक्षातून आभासी विश्वाकडे, तर कधी आभासीपणातून प्रत्यक्षाकडे... हा प्रवास आनंदमयी करू या.
-अमृता धायरकर