सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केले व आपल्या अमर देशभक्तांच्या बलिदानानंतर भारत देश हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. सध्या आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारत देश हा प्रगतीपथावर आहे, विकासाकडे वाटचाल करत आहे. नवनवीन शोध लागत आहेत, सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी भारत प्रयत्नशील दिसत आहे. असे असतानाच भारताला अनेक समस्यांना तोंड देखील द्यावे लागत आहे.
भ्रष्टाचार, वाढती लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अस्वच्छता, प्रदूषण, वाढती गुन्हेगारी यापैकी काही प्रमुख समस्या आहेत. या समस्या निर्माण तरी कशा होतात? तर यातील बर्याच समस्यांच्या निर्माणाला आपणच कारणीभूत आहोत. आपण आपल्या परिसरात इकडे तिकडे कचरा टाकतो, घाण पसरवतो आपणच असत आपणच आपल्या सभोवताली अस्वच्छता पसरवण्यास कारणीभूत ठरतो. ही अस्वच्छता अशीच पसरत राहिली की उकीरडांचे प्रमाण वाढते. या उकीरड्यांमधला कचरा सडून दुर्गंधी व नवनवीन आजारांस कारणीभूत असे किटाणू वातावरणात पसरतात. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढते. म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करत जर आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रारंभ केला, तर हा भारत देश स्वच्छ ठेवण्यास आपण नक्कीच खारीचा वाटा देऊ शकतो.
त्याचप्रमाणे प्रदूषणाचे आहे. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने नदी प्रदूषित होते व जलप्रदूषण वाढते. आपल्या वाढलेल्या गाड्यांचा अतोनात वापर हा वायू प्रदूषणास कारणीभूत आहे. गाड्यांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण वाढते. मग आपण आपला भारत देश हा प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपल्यापासून सुरुवात करत काहीतरी उपाय योजना राबवून फूल नाही तर फुलाची पाकळी का असेना प्रयत्न केला पाहिजे.
'हा देश माझा आहे व मी या देशाचा आहे' अशी भावना ठेवून आपण वागले पाहिजे. 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत' अशी प्रतिज्ञा आपण म्हणतो, पण खरंच आपण इतरांशी बांधवांसारखे वागतो का? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. मी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन फक्त या दोन दिवसाचा तर राष्ट्रभक्त नाही ना, हा विचार आपण एकदा तरी केला पाहिजे व आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यास प्रयत्न केला पाहिजे आणि मी खर्या अर्थाने एक देशभक्त आहे हे सिद्ध केले पाहिजे...
- राधिका नागेश जोशी,
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव