खरा कवी

14 Sep 2023 13:51:31

खरा कवी
एका राजाला त्याच्या खर्‍या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पिटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशेनौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्‍न होता. थोडावेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली.
त्याने प्रधानाला आज्ञा केली की, ‘या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा.’ राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली, ‘या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा.’ तरीही १०-२० उरलेच. त्यातून खर्‍या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली की, ‘या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका.’ राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममाण झाला होता की, त्याला या आज्ञाच मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला, “महाराज, राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही. पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेव्हा दरबारातून निसर्गाच्या सान्निध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राजकवी होतो, नाही तर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो.’ राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या आणि खूश होऊन त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला राजकवी म्हणून घोषित केले.
- प्रविण चिवळे, 
श्री सिद्धेश्‍वर माध्यमिक विद्यालय माजलगाव
Powered By Sangraha 9.0