शिक्षणविवेक आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, “आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ” महिलाश्रम हायस्कूल, इचलकरंजी हॉल येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ६ या नियोजित वेळेत संपन्न झाला. पुणे परिसरातीतील विविध शाळांच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक - पालक गटातील शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्या मधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षणविवेक हि संस्था सातत्याने अश्या नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करते. या बक्षीस वितरण समारंभात इयत्ता ३ री ते ४ थी मधील माधव सदाशिव गोवळकर गुरुजी विद्यालय आणि इयत्ता ८ वी ते १० वी या वयोगटातील महिलाश्रम हायस्कूल च्या गटाने केलेले पपेट सादरीकरण हे मुख्य आकर्षण होते. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण शोभा जोशी आणि मानसी चिटणीस यांनी केले. या बक्षीस वितरण सोहळयाकरिता प्रमुख मान्यवर म्हणून वलय मूळगुंद, वैशाली पोतदार आणि विजय भिडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या विजय भिडेंनी शिकू आनंदे बिनभिंतीच्या शाळा या प्रकल्पाची माहिती दिली, तर बाईपण भारी देवा फेम वलय मूळगुंद यांनी मुलांशी संवाद साधताना असे सांगितले कि, शिक्षण विवेक आयोजित विविध स्पर्धांच्या माध्यमातून मुले आणि पालक हे स्वनिर्मितीचा निखळ आनंद अनुभवत आहेत. स्पर्धेतील यशापेक्षा हे अधिक महत्वाचे आहे. परीक्षक मानसी चिटणीस यांनी पालकांना उद्देशून असे सांगितले कि, तुम्ही मुलांना स्वप्न बघण्यासाठी प्रोत्साहित करा.या स्वप्नांच्या सहाय्याने मुले आपल्या ध्येय्याप्रती अधिक सजग होतील.
आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा ही १ली – २ री, ३ री- ४ थी, ५ वी - ७ वी, ८ वी – १० वी आणि शिक्षक व पालक या वयोगटात पार पडली. यामध्ये २०० गट सहभागी झाले होते. या पपेट सादरीकरण स्पर्धेचा विषय होता ‘कार्टूनच्या गोष्टी’. हा विषय देखील तितकाच वैशिष्ट्यपुर्ण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेसा होता. या संपूर्ण स्पर्धेत मुलांनी केलेले सादरीकरण अतिशय सुंदर होते. यात अगदी ढोलकपुरच्या छोटा भीम, चुटकी पासून ते ग्रामीण भागातील सरपंच काका, निसर्गातील छोटे मित्र पर्यंत कार्टूनची सफर विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना घडवली. विषयाची नीटनेटकी मांडणी, स्पष्ट उच्चार, मुलांमधील निरागसता, गटातील स्पर्धक जर संवाद विसरत असेल तर त्यावेळी केलेले सहकार्य. माईक समोर बोलण्याची लगबग, नवीन गोष्टीबद्दलचे वाटणारे नैसर्गिक कुतूहल यामुळे या स्पर्धेची रंजकता अधिक वाढली. डोरेमोन, नोबिता यांना घेऊन केलेल्या चांद्रयान मोहिमेपासून, बोध देणारे संदेश या स्पर्धेतुन मुलांनी मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी केले तर सूत्रसंचालन सायली शिगवण यांनी केले.