बांद्यापासून चांद्यापर्यंत...

23 Sep 2023 12:57:13

बांद्यापासून चांद्यापर्यंत...
मराठी माणसाची खाद्यसंस्कृती ही अशीच चिऊ काऊच्या मऊ दूधभातापासून सुरू होणारी ही खाद्यसंस्कृती विदर्भातल्या सावजीच्या चमचमीत रस्स्यापर्यंत किंवा कोल्हापूरच्या पांढर्‍या रस्स्यापर्यंत विविधांगाने बदलली आहे.
दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. महारष्ट्रापुरतं बोलायचं तर इथे फक्त भाषाच नाही तर, खाण्यापिण्याची रीतही बदलते. महाराष्ट्राला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा मिळाला आहे; तसेच या राज्याला स्थिर, संपन्नता देणारे भौगोलिक स्थानही लाभले आहे. गहू हे मुख्य अन्न असलेली उत्तरेकडची राज्य आणि केवळ भाताच्या विविध पदार्थांवर भूक भागवणारी दक्षिणेकडची राज्य यांच्या मधोमध महाराष्ट्राचे स्थान असल्यामुळे, चौरस आहार ही संकल्पना मराठी माणसाच्या रोजच्या साध्या जेवणातही प्रत्यक्षात उतरली आहे. सुपीक जमीन, अनुकूल हवामान यांमुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. सगळ्या प्रकारची फळं, धान्य, कडधान्य, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने बदलली आहे. बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रदेशाची स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहे आणि ती त्या त्या मातीत इतकी रुजली आहे आहे की, इथली मुलं शिक्षण, नोकरीनिमित्त परदेशात गेलीच तर, जाताना पापड, लोणची, भाजणी, मेतकूट यंच्याबरोबर त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या असंख्य वस्तूंचे ओझे हसतहसत घेऊन जातात.
याशिवाय कोल्हापूर, पुणे, मुंबई अशी रुचीकेंद्रे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा भाग झाली आहेत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाच्या सीमारेषा या नुसत्या भौगोलिक नाहीत, तर सांस्कृतिकही आहेत. विभागांच्या या सीमारेषांच्या परीघात एक वैशिष्ट्यपूर्ण विभागीय खाद्यसंस्कृती उदयाला आली आहे. यामध्ये खाद्यसंस्कृतीच्या रुचीकेंद्रांनी मिळून महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध केली आहे. हे सांस्कृतिक बदल जाणवण्याइतके स्पष्ट आहेत. खाद्यसंस्कृतीचा संबंध तिथलं भौगोलिक हवामान, पीकपाणी आणि आर्थिक संपन्नता यांच्याशी असतं. त्या भागात होणारे अन्नधान्य हाच त्या भागातल्या लोकांच्या खाण्याचा मुख्य भाग असतो.
विदर्भाची सुपीक काळीशार माती आणि भाज्या, फळं यांची विविधता यांमुळे इथली खाद्यसंस्कृती मूलत: शाकाहारी म्हणावी अशी आहे. याउलट कोकणी खाद्यसंस्कृती आहे. कोकण, निसर्गरम्य कोकणात उपलब्ध साधनसामग्री म्हणजे तांदूळ, नारळ, फणस, आंबे, काजू आणि रम्य समुद्रकिनार्‍यामुळे लाभलेली सिकुडची संपन्नता. या सार्‍यांचा मिलाफ कोकणी खाद्यसंस्कृतीत झाला आहे.
महाराष्ट्र म्हटले की, यामध्ये असंख्य अशा विविध रूपांनी नटलेले आहे आणि मला या सर्व गोष्टींचा खूप गर्व वाटतो. खूप कौतुक वाटतं.
- भूमिका बोंडाईत,
शि.प्र.मं.मराठी माध्यमिक शाळा, यमुनानगर, निगडी
Powered By Sangraha 9.0