माझे बाबा

16 Apr 2024 16:13:02


माझे बाबा

 

‘‘वडील म्हणजे उंबराचं झाड असतं

लपलेल्या भावनांचं जणू खोडं असतं

वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं

खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं’’

वडील म्हणजे मनाचा असा कोपरा, जो बाहेरून कठीण पण आतून खूप मऊ, भावना प्रधान, हळवा असा अगदी फणसासारखा असाच माझाही बाबा.

तसं मी आजच्या पिढीतली म्हणजे डॅडी, पपा, फादर, डॅड, पॉप्स असे शब्द वापरणारी सगळी मुलं. पण माझ्या आईने मला बाबा म्हणायला शिकवलं आणि मी ही आधी बाबाचं म्हणायला शिकले. आई नाही. अगदी लहान असल्यापासून तो ऑफिसला गेल्यावर मला खूप रडू यायचं. मग मी संध्याकाळची वाट पाहायचे तो येण्याची!

हो, इथे एक सांगावंसं वाटतं. सगळे आमच्या घरातले. आम्ही मराठी मध्यमवर्गीय म्हणजे संस्कार, रुढी परंपरा जपणारे. म्हणून माझी आजी ओरडायची, ‘अगं अहो, बाबा म्हणावं.’ पण मग त्यात मला हक्क, प्रेम, ओढ वाटत नाही. ‘आईला अगं आई!’ असं म्हणून भरभरून प्रेम करायचं आणि बाबावर नाही. त्याची भीती नाही तर प्रेमयुक्त आदर वाटायला पाहिजे.

माझा बाबा त्याला गाता येत नाही, नाचता येत नाही. पण मी हट्ट केला की तो मला अंगाई गाऊन झोपवतो. माझ्या बरोबर नाचतो. कितीही दमला तरी मला रात्री केसांना मालीश करतो. माझ्या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला सुट्टी घेतो. त्याची महिन्याची आर्थिक गणितं उलटीपालटी करून मला फिरायला घेऊन जातो. माझी सगळी हौस करायचा प्रयत्न असतोच. त्याचा मला सायकल चालवायला आणि पोहायला यायला लागल्यावर खूप आनंद होतो. मग आमची वडापावची पार्टी होते. ऑफिसमधूनही त्याचे दोन तरी फोन असतातच. मी शाळेतून आले का? जेवले का? आराम कर, मग अभ्यास कर, व्यायाम कर...सगळीकडे त्यांच लक्ष!

एकदा आम्ही असंच फिरायला गेलो. तिथे साहसी खेळ होते. त्याला ते फार आवडत नाही. पण माझ्यासाठी केले त्यानी. ते सहसा लोक आईबद्दल बोलतात. खूप लिहितात, चित्रपट करतात; पण बाबा त्यांचं प्रेम, त्याग, दुर्लक्षित राहतं. मला संदीप खरेचं गाणं ऐकलं की वाटतं आईची आणि बाळाची नाळ जोडलेली असते. मग बाबाची काय जोडलेली नसते?

तर ते मन, हृदय किंवा एक भावनिक कोपरा. जो कधीच आयुष्यात रिकामा होऊ शकत नाही. कारण बाबा हा बाबा असतो.

बाबा असतो वडासारखा

मातीत घट्ट रुतून कुटुंबाला सावली देणारा

स्वत: ऊन सोसणारा

- ओवी अमेय कुलकर्णी, 5 वी,

रेणुका स्वरूप प्रशाला, पुणे

Powered By Sangraha 9.0