ठमाबाई...

26 Jun 2024 12:12:58


ठमाबाई...  

 एक होती ठमाबाई. नावाप्रमाणेच ठसकेबाज. सगळ्यांनी तिचंच ऐकलं पाहिजे, असा तिचा हेका. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू आणि छोटी-मोठी चुलत भावंडं अशा एकत्र कुटुंबात तिचं कुण्णाशी म्हणून पटत नसे. ठमाबाईच्या हट्टी स्वभावामुळे सगळ्यांशी तिची भांडणं व्हायची. भांडणं झाली की, ठमाबाई चिडायची आणि थोड्या वेळाने रडायला लागायची
   जसं घरी तसंच शाळेत. सगळ्या मैत्रिणींनी तिचंच ऐकलं पाहिजे, असं तिला वाटायचं. शाळेत सारखंच तिचं कोण ऐकून घेणार? मग ताईंकडे ठमाबाईच्या तक्रारी जायच्या. ताई कधी समजावून सांगायच्या तर कधी रागवायच्या, पण ठमाबाईमधे काही फरक पडत नव्हता. कधी कधी तिला ताई जे म्हणतात ते पटायचं, पण पटलं तरी वळत नव्हतं हेच खरं. एक दिवस काय झालं, शाळेत एका स्पर्धेची नोटीस आली. ही आगळीवेगळी स्पर्धा ऐकून सगळ्यांना गंमतच वाटली. स्पर्धेचं नाव होतं, ‌‘मित्रमैत्रिणी जमवा स्पर्धा.‌’ २५ डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी जमवायच्या. त्यांना कुठला पदार्थ आवडतो, त्यांचे वाढदिवस, त्यांना आवडणारा रंग, त्यांच्यातले गुण अशी ज्यांना जास्तीतजास्त मित्रमैत्रिणींबद्दल माहिती आहे त्यांना बक्षीस मिळेल. ठमाबाईच्या मनात आलं आपणही या स्पर्धेत भाग घेतला तर...
   शाळेतून आल्यावर ती पळतच आजीकडे गेली. पूर्ण घरात तिचं आजीशी मात्र छान पटायचं.‌‘आजी, आजीऽऽऽ आजी गं. आज आमच्या शाळेत एक गंमतच झाली.‌’ ‌‘अगं बाई कसली गंमत?‌’ आजीने उत्सुकतेने विचारलं. ‌‘अगं ‌‘मित्रमैत्रिणी जमवा‌’ अशी एक स्पर्धा आहे. आजी, मला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे गं आणि जिंकायचं आहे. पण माझी तर सगळ्यांशीच भांडणं होतात. मला काहीतरी युक्ती सांग नं.‌’, ठमाबाई आजीच्या गळ्यात पडून म्हणाली. तशी तिचं बोलणं ऐकून आजीच्या पोटात मायेने कालवाकालवच झाली.‌‘हो. घे की तू भाग. त्यात काय! पण ठमाबाई, आत्ताच आला आहात नं शाळेतून. आधी गरमगरम जेवा आणि मग मी सांगते  युक्ती. चालेल? ठमाबाईच्या पाठीवरून हात फिरवत आजी हसत हसत म्हणाली. ठमाबाईचं जेवण आटोपलं तसं ती परत आजीजवळ आली. ‌‘हं आता सांग. मी काय करू म्हणजे मी या स्पर्धेत जिंकू शकेन?‌’ ‌‘हे बघा ठमाबाई, मला सांगा स्पर्धेचं रिझल्ट लावायचं काम कुणाचं? ताईंचं की नाही. मग स्पर्धेत कोण जिंकणार ते त्याच ठरवणार. आपण फक्त भाग घेऊ शकतो आणि प्रयत्न करू शकतो. जिंकणं-हरणं हे ताई ठरवतील.” ‌‘ओकेऽऽ बरं. पण नक्की काय करू ते तर सांग.‌’आता मी एक युक्ती सांगते तुला. हे बघ जास्तीतजास्त मित्रमैत्रिणी जमवायच्या असतील तर आधी त्यांचं ऐकायला शिकलं पाहिजे. माझंच ऐकायचं, मी म्हणेन तसंच खेळायचं हा आपला हट्ट असतो की नाही तो बाजूला ठेवला पाहिजे. सुरुवातीला मित्रमैत्रिणी म्हणतील ते खेळता आलं पाहिजे.‌’ ‌‘पण सारखं त्यांचंच ऐकायचं? नेहमी ते म्हणतील तसंच खेळायचं?‌’    ठमाबाईच्या कपाळावर आठ्या यायला लागल्या. तशी आजी म्हणाली, “ठमाबाई, सुरुवातीला तसंच करावं लागेल. मग एकदा तुम्ही त्यांचं पण ऐकताय, मित्रमैत्रिणी म्हणतील तसं खेळताय असं त्यांच्या लक्षात आलं की, ती सगळी तुमचंपण ऐकायला लागतील, पण तोपर्यंत सारखंसारखं चिडायचं नाही. तेवढं मात्र आठवणीने करावंच लागेल. बघा स्पर्धेत भाग घ्यायचा असेल आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर...‌’ ‌‘हो हो. मी प्रयत्न करेन. आजी तू पण मला आठवण करून दे हं अधूनमधून.‌’ ‌‘हो तर. शहाणी गं आमची ठमाबाई.‌’ठमाबाईची सुरुवात घरापासूनच झाली. तिच्या चुलत भावंडांबरोबर खेळताना ठमाबाईला सावध करायला तिची आजी प्रयत्न करायची. हळूहळू ठमाबाईमधला बदल घरात सगळ्यांच्या लक्षात यायला लागला. शाळेतही महिन्याभरात ठमाबाईबद्दल एक दोन नगण्य तक्रारी सोडल्या तर सगळं सुरळीत चालू आहे, हे ताईंच्या नजरेने ओळखलं. ठमाबाई आता सगळ्यांसोबत मिळून मिसळून खेळायला लागली आहे, तिचा हट्टीपणा कमी कमी होतो आहे, हे ताईंच्या नजरेने टिपलं.ठमाबाईला आता खूप मित्रमैत्रिणी आहेत. ठमाबाईने मित्रमैत्रिणी जमवा स्पर्धेत सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं. मैत्रीचं साखरगुपित तिला मिळालं.

स्वाती देवळे

Powered By Sangraha 9.0