
खरं तर संगीत प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी निगडित असलेलं. प्रत्येकाला संगीत येईलच असे नाही किंवा त्याला संगीत समजलेच पाहिजे असं नाही शास्त्रशुद्ध ज्ञान नसलेल्या व्यक्तीसुद्धा गीत, गायन, वादन या गोष्टींबरोबर कधी एकरूप होतो त्याला कळत नाही. तणावातून बाहेर पडायचं असेल, तर संगीत, मनाला शांती हवी असेल तर संगीत, मनाचा, आनंद दाखवायचा असेल तरीही संगीत आणि दुःखातून आनंदाकडे जायचे असेल तर तरीही संगीत! संगीत हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग. माझं आवडतं गाणं म्हणायचं झालं, तर कितीतरी अशी आवडती गाणी आहेत. पण सर्वात जवळचं, आवडतं आणि हृदयाशी एकरूप झालेली गाणी असतात ती म्हणजे बाळ लहान असतं त्या वेळेस आईने त्याच्याशी साधलेला संवाद तोही गाण्यातून.किती मजा आहे बघा ना! बाळ पोटात असल्यापासून आई काही तरी गुणगुणत असते. मुळात गाण्याचे संस्कार हे गर्भातूनच त्या बाळावर होत असतात आणि आईचा आवाजही तो ऐकत असेल आणि कदाचित त्यामुळेच जन्माला आलेलं बाळ पहिल्यांदा आईच्या गुणगुण करण्याला प्रतिसाद देत असेल.गंमत वाटते किती साधी, सोपी आणि सहज असतात ही आईची गाणी. बाळ जेवत नाही म्हणून एक घास चिऊचा, एक घास काऊचा अशा गीतांमधून नकळतपणे दिलेला पर्यावरणाचा संस्कार. चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? अशा छोट्याशा गीतांमधून चांदोबा हा तुझा मामा आहे हे नात्यांचे घडवलेले अनेक संस्कार.
दिवसभरामध्ये कितीतरी लीला हे बाळ करत असतं. या प्रत्येक त्याच्या बाललीलांमध्ये आई त्याच्याबरोबर जोडलेली असते आणि त्याच्याबरोबर वावरत असताना तिची रोजची कामं करत असताना त्याला सांभाळत असताना आई सहज त्याच्याबरोबर बोलण्यातून आणि गाण्यातूनही संवाद साधत असते. अडगुलं मडगुलं सोन्याच कडगुलं, रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा या गीतापासून बाल संगीताची सुरुवात होते बरं का! आणि मला वाटतं प्रत्येक घरात ही अशाच प्रकारे सुरुवात होत असेल.‘इथे इथे बस रे मोरा चारा खा’ अशा लयबद्ध, परंतु कोणतीही चाल नसलेल्या छोट्याशा या गीतामधून बाळ आपल्या हाताचा वापर करायला लागतो, हसायला लागतो.
आपडी थापडी गुळाची पापडीधम्मक लाडू तेल काढू अशा गीतांमधून समाजात असणारे इतर व्यवसायांची माहिती तर तिला द्यायची नसेल?‘करंगळी मरंगळी मधले बोट चापेकळी’ ही गीत म्हणत म्हणत आई बाळाला कदाचित आपल्या अवयवांची पण माहिती करून देत असेल. अशा छोट्या छोट्या गीतातून हा सुरू होणारा प्रवास नंतर मामाच्या गावाला जाऊ या, नाच रे मोरा अशा गीतातून शाळेपर्यंत घेऊन पोहोचवतो आणि कदाचित आईचे काम संपते. कारण शाळेत त्यांच्यापुढे नंतर अनेक गीतांचा खजिनाच उपलब्ध असतो आणि जन्मापासून नव्हे गर्भापासून संगीताशी नाळ जोडणारी आई शाळेशी आपोआप जोडली जाते आणि मग तेच बाळ शाळेत शिकवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, गाणी आईला घरी येऊन सांगतो. आपल्या जीवनात अनेक गाणी आपण ऐकतो त्यातील काही आपल्याला तृप्त करतात आणि काही मनाला भावतात, मनाशी जोडली जातात. परंतु आईची ही गाणी मात्र काहीतरी वेगळीच अतिव सुंदर तितकीच हृदयस्थ!
- ज्योती पोकळे