म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन.

01 Oct 2025 15:08:09

म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन.
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या मेळाव्याला विविध पिढ्यांतील माजी विद्यार्थी उपस्थित राहिले. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेप्रती जिव्हाळा आणि अभिमान व्यक्त करण्याचा हा सोहळा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात नावनोंदणी व स्वागत समारंभाने झाली. त्यानंतर शाळा व विद्यार्थी संवाद सत्रात शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा भावनिक संवाद रंगला. माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, शाळेची प्रगती आणि भावी पिढ्यांसाठी घ्यायचे उपक्रम या विषयांवर मते व्यक्त झाली.
मेळाव्यात शाळेच्या आजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वागतगीत, समूहगीत तसेच गुजराती गरबा, कोळी नृत्य या सादरीकरणांनी टाळ्यांचा कडकडाट मिळवला. दोन माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे जुन्या आठवणींना स्वरांची जोड मिळाली.
कार्यक्रमानंतर सर्वांनी शाळेची पाहणी केली. वर्गखोल्या, बाग, खेळाचे मैदान, सभागृह पाहताना जुने विद्यार्थी आपल्या लहानपणीच्या आठवणीत रमले. जुन्या वर्गमित्रांमध्ये गप्पा गोष्टी झाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांनी केले.
या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी व शाळा यांच्यातील नाते आणखी दृढ झाले. शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरावा, अशी भावना यावेळी शाळेच्या महामात्रा मानसी भाटे यांनी व्यक्त केली. माननीय मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0