तस्मै श्री गुरुवे नम:

13 Oct 2025 17:53:59

तस्मै श्री गुरुवे नम: 
गृरुपौर्णिमा
 
   गुरु शिष्येच्या परंपरेवर जगातील उत्क्रांती आणि प्रगती अखंडीतपणे चालू आहे. गुरुजनांचे स्थान हे ग्रह- ताऱ्यांप्रमाणे अढळ आहे. २१ व्या शतकात विज्ञानाच्या जोडीला तंत्रज्ञानाची जोड लागली आणि संगणक, मोबाइल, ईमेल, व्हॅाटसपचा जमाना सुरू झाला. मात्र तरीही “गुरुविन कोण दाखविल वाट” यां उक्तीप्रमाणे गुरुजनांचे स्थान अजूनही तेवढेच पवित्र, मंगलमय व आधार देणारे आहे. संगणकावर एका सेकंदात साऱ्या जगाचे ज्ञान आपल्यासमोर येऊ शकते, मात्र त्या ज्ञानाला संस्काराची जोड नसते. आपल्याला Education आणि Knowledge बरोबरच Wisdom ची ही जोड मिळते हे गुरुंमुळेच घडू शकते.
   ‘गुरुपौर्णिमा’ ही सद्गुरूची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु- शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करावयाची तो हा दिवस होय. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात, ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनीना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. व्यासपौर्णिमेच्या दिवशी ॐ नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून, त्याना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत गुरु परंपरा प्राचीन काळापासून आहे.पूर्वी आजच्या सारख्या शाळा नव्हत्या- तर गुरुगृही जाऊनच ज्ञान मिळवावे लागे. तिथे ज्ञाना-जनाबरोबर, गुरुंची सर्व कामेही करावी लागत. त्यातून श्रमप्रतिष्ठा आपोआप येई. राजपुत्रांबरोबरच इतर मुलेही आश्रमात असत, त्यामुळे लहान- मोठा गरीब- श्रीमंत हा भेदभाव नसे. निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या हवेत मुलं राहत, रविंद्रनाथ टागोरांनी सुरु केलेली 'शांतीनिकेतन" ही शाळा त्याच्याच नमुना आहे.
   मुलांना गुरुबद्दल नितांत आदर असे जो गुरु आपल्याला ज्ञान देतो, आपल्याला मोठा करतो, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा हा दिवस. या दिवशी आपल्या आधीच्या शिक्षकांनाही भेटावे त्यांना नमस्कार करावा. शाळेत शिकवणारा गुरु हाच फक्त शिक्षक असतो असे नव्हे, तर आपल्याला पहिले शिक्षण आई देते, त्यानंतर वडील. आजुबाजूच्या ज्या ज्या गोष्टीपासून आपण काही शिकतो ते सर्व आपले गुरु. अगदी लहान मुंगी सुद्धा आपल्याला चिकाटी, एकता इ. गुण शिकविते. निसर्ग हा तर सर्वात मोठा गुरु मानतात. ग्रंथ हे ही आपले गुरुच. समाज गुरु. अर्थातच जो जो जयाचा घेतला गुण। तो तो गुरु केला जाण।।
देवांचे गुरु बृहस्पति मानले जातात तर दानवांचे गुरु शुक्राचार्य. त्यांची सेवा करुन कच संजीवनी विद्येची प्राप्ती करून घेतली. आपल्या देशात काही आदर्श गुरु व शिष्य होऊन गेलेत. जसे की विश्वामित्र - श्रीराम, संदीपनी – श्रीकृष्ण , द्रोणाचार्य - अर्जुन,एकलव्य, धौम्यऋवर्षी- आरूणी निवृत्तीनाथ - ज्ञानेश्वर, रामदास स्वामी – शिवाजी महाराज, मं. गांधी- नेहरू, रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद ....
   हे गुरु मोठे होतेच. पण त्यांच्यापेक्षा त्यांचे शिष्यही मोठे झाले- गुरुला नेहमी आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा असेच वाटत असते व हे शिष्यही त्यांच्या परीक्षेला उतरले . तसे आपणही मोठे व्हावे.
   यादिवशी गुरुंचे स्तवन या श्लोकातून केले जाते- गुरुब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरा। गुरुः साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
या श्लोकात गुरूंचे महत्त्व चांगल्या पद्धतीने वर्णन केले आहे. गुरू म्हणजे निर्माता – साक्षात् ब्रह्मदेव, गुरू म्हणजे पालनकर्ता विष्णु, गुरु म्हणजे भगवान श्री शंकर अर्थात गुरु म्हणजे या तिन्ही देवांचे शक्तींचे एकत्रित रूप – साक्षात् परब्रह्म होय. म्हणूनच गुरुच्या पूजनामुळे, सेवेमुळे ईश्वराची कृपा लाभते. आपल्या जीवनाचे कल्याण होते.
गुरु हा संतकुळीचा राजा ।
गुरु हा प्राण विसावा माझा ||
सौ. सुरेखा सतीश भामरे
एच. ए. स्कूल, प्राथमिक विभाग
पिंपरी, पुणे
Powered By Sangraha 9.0