संकटकाळातले प्रयोग म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतात ते माझ्या संकट काळातले प्रयोग. प्रयोग तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतच असतो पण या संकटकाळातले प्रयोग म्हणजे गमतीशीर व वेगळे आहेत लक्ष द्या.
तसं माझ्या जीवनात मागच्याच काही दिवसात एक संकट आलं होतं. त्या परिस्थितीवर माझे प्रयोग कसे होते हे या प्रसंगातून सांगत आहे.
'गणित प्रभुत्व' नावाचं माझं एक छोटं निळ्या रंगाचे मुखपृष्ठ असलेले पुस्तक, बाजारात त्याचा स्टॉक संपला होता, म्हणून मला माझ्या शिक्षकांनी ते शोधून माझ्या अभ्यासासाठी दिले होते. आता सोमवारी मी ते पुस्तक शाळेत घेऊन गेले व ते सोडवत होते. मला एक गणित अडलं, मी ते सगळ्यांत सोडवण्यास सांगितलं त्या नंतर शाळेची घंटा वाजली. शाळा सुटल्यानंतर घरी पोहचल्यावर अभ्यास करण्यासाठी मी पुस्तक शोधू लागले तर मिळतच नव्हतं. मी खूप चिंतीत झाले होते. आता हे संकट माझ्यावर आले तेव्हा मी आधी सगळीकडे नीट शोधलं नंतर तर असे विचार यायला लागले की पुस्तक दप्तरातून रस्त्यात तर पडलं नाही नं ! त्या रस्त्यावर मी जाऊन पाहिलं पण तिथे ते नव्हतं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर बाकाखाली, कपाटात सगळीकडे नीट शोधलं पण नाही मिळालं. नंतर मी ते पुस्तक विकत घ्यायचं असं ठरवलं सगळ्या पुस्तकांच्या दुकानात चौकशी केली.
एकही दुकान मी सोडलं नाही पण त्याचा स्टॉकच संपला होता. जेव्हा पण दुकानाच्या आत पाय ठेवायचे, मनात एकच इच्छा असायची, 'ह्या दुकानात मिळून जाईल' नंतर तेच दुकानदार पुस्तकाचं नाव घेतलं की 'पुस्तक नाही' अशी नकारार्थी मान हलवायचे तेव्हा रागही येत होता. असं वाटत होतं कोणी तरी माझ्या मदतीसाठी येऊन मला ते पुस्तक देऊन जावं. पण असं थोडी होणार ! एका दुकानात तर जाण्याच्या आधीच बाहेर छान मोठे सूचना फलक लावले होते आणि त्यावर लिहिले होते की 'गणित प्रभुत्व हे पुस्तक उपलब्ध नाही. '
ते पुस्तक शोधण्याच्या नादात मी पूर्ण घराचीच साफसफाई केली. जिथे जिथे मला निळ्या रंगाचं पुस्तक दिसत होतं, त्यावेळी, त्याक्षणी मी खुश व्हायचे, पण नंतर कळायचं, ते तर दुसरचं पुस्तक आहे. जो पर्यंत मला ते पुस्तक मिळणार नव्हतं तोपर्यंत मला झोप लागणार नव्हती. एवढं सगळी कडे शोधून ही न मिळाल्याने मी उदास झाले पण आशा सोडली नाही, झोपेत सुद्धा मला ते पुस्तक दिसत होते. त्यादिवशी तर आईचं कपड्यांचं कपाट देखील शोधलं, चुकून लहान बहिणीने टाकलं असेल पण नाही सापडलं. शेवटी उदास मनाने अभ्यास करायला बसले तेवढयात आईने आवाज दिला, आईला बॅग धुण्यासाठी हवी होती. आईला बॅग धुण्यासाठी दिली तेवढ्यात आईने आवाज दिला “हे बघ, तुझं पुस्तक!”
ते पुस्तक सापडलं हे ऐकून मला जग जिंकल्यासारखं वाटू लागलं. ते पुस्तक त्याच दिवशी मी बाईंना देऊन टाकलं आणि मी चिंतामुक्त झाले.
सकिना मुलाणी
इ. ८ वी
महिलाश्रम हायस्कूल