जगण्याच्या वाटचालीत सुख-दु:ख, आनंद-खिन्नता यांचा समतोल असतो. प्रत्येक युगात काही ना काही संकटे समाजासमोर उभी राहिली आहेत. नैसर्गिक आपत्ती, युद्ध, रोगराई, आर्थिक अडचणी, दुष्काळ, पूर, भूकंप यांसारख्या संकटांनी मानवाच्या जगण्याला मोठे आव्हान दिले आहे. पण संकट हे नेहमीच नवे प्रयोग, नवी दिशा आणि नव्या कल्पनांचे दार उघडते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी केलेले उपाय म्हणजेच संकटकाळातील प्रयोग होत.
उदाहरणार्थ, कोरोना महामारीत संपूर्ण जग एका ठिकाणी थांबले होते. रुग्णसंख्या वाढत होती, उद्योगधंदे बंद झाले होते, शाळा-महाविद्यालये ओस पडली होती. अशा वेळी ऑनलाईन शिक्षण ही नवी पद्धत उदयास आली होती. शिक्षक-विद्यार्थी मोबाईल, संगणक व इंटरनेटच्या सहाय्याने अभ्यास करू लागले. कामगार व अधिकारी घरबसल्या काम करू लागले, म्हणजेच वर्क फ्रॉम होम सुरू झाले. किराणा, औषधे, कपडे यांसाठी ऑनलाईन खरेदीची पद्धत झपाट्याने वाढली. या प्रयोगांसाठी जगभरात बरेच प्रयत्न चालू होते. शेवटी तो सफल झाला. संकटामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि लोक डिजिटल युगाशी अधिक परिचित झाले.
फक्त आधुनिक बाबतीतच नाही तर जुन्या काळातही असे प्रयोग दिसतात. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी पाणी वाचवण्यासाठी विहिरी, तलाव, बंधारे, शेततळी बांधली. काही ठिकाणी सामूहिक शेतीचे प्रयोग झाले. काही ठिकाणी सामुहिक शेतीचे प्रयोग झाले. नैसर्गिक आपत्तीत पीक नष्ट झाले तर लोकांनी पर्यायी पिकांचा विचार केला. कठीण काळात शेतकऱ्यांना पर्यावरणापूरक, सेंद्रीय शेतीकडे वळण्यास भाग पाडले.
संकटाकाळातील प्रयोग केवळ विज्ञान-तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसतात. सामाजिक जीवनातसुद्धा त्यांचा प्रत्यय येतो. गरिबी किंवा बेरोजगारीच्या काळात लोकांनी छोट्या-छोट्या उद्योग धद्यांना सुरुवात केली. महिलांनी स्वयंसहाय्यता गट तयार करून व्यवसाय सुरु केला.
म्हणूनच संकट हे नेहमीच घाबरवणारे नसते, तर ते आपल्याला धैर्य, कल्पकता आणि सहकार्य शिकवते. संकट हा शेवट नसतो, तर तो नवे मार्ग शोधण्याची संधी असतो. संकटाकाळातील प्रयोगांमुळे समाज अधिक सक्षम, सुजाण आणि प्रगतिशील बनतो.
कु. स्पृहा सुमित जाधव
इ. ७ वी,
महिलाश्रम हायस्कूल.