डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शनिवार दिनांक 20 डिसेंबर ते बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात साजरे झाले.
सुप्रसिद्ध मन:शक्ती प्रशिक्षक डॉ. दत्ता कोहिनकर व लोकप्रिय अभिनेते तेजस बर्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
हसा,खेळा,अभ्यास करा,आई बाबा व शिक्षकांचा आदर करा,सगळ्यांवर प्रेम करा असा संदेश पाहुण्यांनी दिला.प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांच्या कुशल व कल्पक मार्गदर्शना नुसार स्नेहसंमेलनाची रूपरेखा निश्चित करून कार्यवाही करण्यात आली. कार्याध्यक्ष राजेंद्र पवार व कार्योपाध्यक्ष ऋचा कुलकर्णी यांनी स्नेहसंमेलनाचा कार्यभार सांभाळला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वेदांत जोशी व श्रेयस जाधव यांनी काम पाहिले.शाळा समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर,वित्त नियंत्रक डॉ.विनयकुमार आचार्य, संस्थेचे सदस्य मिलिंद कांबळे यांची सन्माननीय उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.विविध क्षेत्रात सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन करण्यात आले.प्रशालेचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.राष्ट्रगान वंदेमातरम सार्धशती निमित्ताने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर रंजन कार्यक्रम सादर केले. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या संगीत आनंदमठ या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग हे संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य समर या दैदीप्यमान महानाट्यातून साकार केला. या दोन्हीही नाटकांचे दिग्दर्शन प्रशालेचे नाट्यकर्मी शिक्षक रवींद्र सातपुते यांनी केले तर
नेत्रदीपक नेपथ्य प्रशालेचे उपमुख्याध्यापक व कलाशिक्षक जयंत टोले यांनी केले.प्रशालेच्या पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजुषा शेलूकर,शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का,शिक्षक प्रतिनिधी प्रवीण महामुनी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले.
स्नेहसंमेलन हा शाळेचा वार्षिक उत्सव मोठ्या दिमाखात आनंदात संपूर्ण झाला.