गीता जयंती - मोक्षदा एकादशीचे महत्त्व

04 Dec 2025 15:12:13

geeta jayanti, mokshada ekadashi
      मोक्षदा एकादशीला भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गीता जयंती उत्साहाने संपन्न केली जाते. ५१४० वर्षांपूर्वी याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगून मार्गदर्शन केले. कुरुक्षेत्रावरील प्रसंग अर्जुनाच्या समोर त्याचे तात,पितामह, भीष्म गुरु द्रोणाचार्य,कृपाचार्य,अश्वत्थामा दुर्योधन असे सर्वजण युद्धासाठी उभे होते. आपल्या बांधवांच्या बरोबर युद्ध करण्यापेक्षा मी शस्त्र ठेवतो. पण कृष्णाने अर्जुनाला महाभारताचे युद्ध हे धर्म आणि अधर्म यातील युद्ध होय. हे सात्विक वृत्ती आणि राक्षसी वृत्ती यातील युद्ध होय.
      या युद्धासाठी अर्जुनाला सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला अठरा अध्यायांची भगवद्गीता सांगितली. भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग ,भक्तियोग त्याला सांगितले.
      मानवी जीवनामध्ये प्रत्येक कर्मा बरोबर त्याचे फल येते. उदाहरणार्थ एका व्यक्तीने एका बागेमधील रसरशीत फळे पाहिली ही फळे डोळ्यांनी पाहिली, पाय त्याला त्या फळापर्यंत घेऊन गेले. हाताने ती फळे काढली आणि तोंडाने खाल्ली. पण जेव्हा राखणदार आला तेव्हा त्याला जी शिक्षा झाली त्यातून डोळ्यातून पाणी आले. म्हणूनच सत्कर्म आणि सदाचार हेच जीवनाचे सार आहे.
असेच दुसरे उदाहरणही आपल्याला पाहता येते की एक मूर्तिकार अतिशय सुंदर मूर्त्या तयार करत असतो. त्यांनी केलेल्या मूर्तिमध्ये प्रत्यक्ष भगवंतच आहे की काय असे वाटत असते. एक दिवस एक सत्पुरुष त्या मूर्त्या पाहून त्याला सांगतो की माझ्याजवळ तुला देण्यासाठी काही नाही पण दोन दिवसानंतर यमदूत तुला नेण्यासाठी येणार आहेत, हे मी भविष्य सांगू शकतो. तो मूर्तिकार आपल्यासारख्याच नऊ मूर्त्या तयार करतो‌ यमदूत ज्या वेळेला येतात त्यावेळेला दहावी मूर्ती म्हणून उभा राहतो. यमदूतांनाही प्रश्न पडतो, यातला खरा मूर्तिकार कोण आणि ते परत निघतात. तेवढ्यात त्यांची नारद ऋषींशी भेट होते आणि ते दोघे परत त्या मूर्तिकाराच्या घरी येतात. मूर्तिकार पुन्हा त्या ठिकाणी उभा राहिलेला असतो. या वेळेला नारदमुनी मूर्तीतील दोष दाखवायला सुरुवात करतात‌. ते ऐकताच मूर्तिकार स्वतःच पुढे येतो आणि म्हणतो मी या मूर्त्या खूप परिश्रमाने मागील काही दिवसात निर्माण केल्या आहेत. यावेळी नारदमुनी यमाला सांगतात की हाच आपला मूर्तिकार. तात्पर्य मी पासून मुक्त झाल्याशिवाय मोक्षाची वाटचाल होत नाही.
      आणि या मी पासून मुक्त झाल्याशिवाय मोक्ष ही प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट ही मी करत नसून परमेश्वर माझ्याकडून करून घेत आहे, हेच आपल्याला भगवद्गीतेतून शिकायला मिळते.
      वैदिक हिंदू धर्मातील भगवद्गीता जयंती म्हणजेच एका ग्रंथाची जयंती पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळ साजरी करणारा भारत हा जगातील एकमेव देश असे चिंतन हेमंत पाठक सरांनी व्यक्त केले.
      गीता जयंतीनिमित्त प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आणि सर्व शिक्षकांनी भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण संस्कृत शिक्षिका वर्षा गानू यांच्या मार्गदर्शनाने केले. श्रीकृष्ण पूजन, भगवद्गीतेच्या पुस्तकांचे पूजन यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले व पदाधिकारी अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी केले.
      विद्यार्थ्यांच्या जीवनात गीतेचे तत्वज्ञान कृतीतून उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अपशब्द बोलणार नाही, दुसऱ्याला विनाकारण त्रास देणार नाही, उत्तम अभ्यास करून मी माझे विद्यार्थी कर्तव्य पालन करेन असे तीन संकल्प करुन घेण्यात आले.
Powered By Sangraha 9.0