न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशाला आणि 'ऑलिव्ह ग्रीन वेंचर्स फौंडेशन, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने १९६५ च्या युद्धाला साठ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त प्रत्यक्ष युध्दभूमीवर काढलेल्या दुर्मिळ छायाचित्रांद्वारे त्या काळातील इतिहास लोकांसमोर जिवंत केला जाणार आहे. या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त एअरमार्शल प्रकाश सदाशिव पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे ,माजी विद्यार्थी जयप्रकाश रामचंद्र भट, डी.आर.डी.ओ मधील शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, लष्करी इतिहासकार नितीन शास्त्री, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर व शालेय पदाधिकारी उपस्थित होते.
या मान्यवरांचे स्वागत एन.सी.सी विभागातील विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन केले. विद्यार्थी समर्थ राऊत याने एअरमार्शल प्रकाश पिंगळे यांना स्वतः काढलेले स्केच भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी भारतीय सैन्यदलाच्या या यशोगाथेतून विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन इतिहास घडवण्याचा प्रयत्न करावा असा संदेश आपल्या प्रास्ताविकातून दिला.
एअर मार्शल प्रकाश सदाशिव पिंगळे यांनी प्रत्यक्ष १९६५ च्या युद्धाच्या वेळी त्यांनी विमानांचा हल्ला कसा रोखला व ते युद्धामध्ये कसे यशस्वी झाले हा साहसी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर कथन केला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी जयप्रकाश भट यांनी नागरिकांसमोर इतिहास जागृत ठेवण्यासाठी आमची संस्था या प्रदर्शनाचे आयोजन करीत असते असे सांगितले.
शाळासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या मनामध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून आर्मी ,नेव्ही, तसेच सैन्य दलात भरती व्हावे असा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देवळणकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एन.सी.सी विभाग प्रमुख राजेंद्र पवार यांनी करुन दिला. पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.