भाषेविषयी बोलताना...

21 Feb 2025 19:00:00


bhashevishayi bolatana

मित्र-मैत्रिणींनो,
भाषा हा संस्कृत शब्द ‌‘भाष्‌‍‌’ या धातूपासून तयार झाला आहे. मनातल्या कल्पना शब्दांच्या आधारे प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा. भाषेतल्या शब्दांचा उगम कसा झाला आणि ती कशी विस्तारत गेली; तसेच त्यातल्या नियमांचा अभ्यास म्हणजे ‌‘भाषाशास्त्र‌’. ‌‘भाषक‌’ म्हणजे (भाषा) बोलणारा जसे; मराठीभाषक, हिंदीभाषक, फ्रेंचभाषक वगैरे, तर ‌‘भाषिक‌’ म्हणजे भाषेसंबंधी, भाषाविषयक जसे की, भाषिक वाद, भाषिक चर्चा, भाषिक आंदोलन वगैरे. ‌‘भाषाशैली‌’ म्हणजे भाषेची पद्धत कशी आहे किंवा धाटणी कशी आहे. उदा., साधी-सोपी आहे की, बोजड आहे.
भाषेचे स्वरूप भिन्नभिन्न प्रदेशांत वेगवेगळे असते. थोड्याथोड्या अंतराने भाषेमध्ये थोडाफार फरक झालेला आपणांस आढळून येतो. त्याला प्रांतिकभाषा किंवा बोलीभाषा म्हणतात. म्हणजेच, रोजच्या व्यवहारात जी भाषा ज्या ठिकाणी वापरली जाते, ती तिथली बोली भाषा. म्हणून ‌‘दर दहा बारा कोसांवर भाषा बदलते‌’, असे म्हणतात. मात्र, शासकीय व्यवहारात किंवा कामकाजासाठी, पुस्तके वाचताना, लिहिताना जी भाषा वापरली जाते, ती काही नियमांवर आधारलेली असते; जेणेकरून त्यातले शब्द सगळ्यांना समजतील आणि नियम मान्य असतील; अशा भाषेला म्हणतात प्रमाणभाषा.
बोली आणि प्रमाण मधला फरक कसा ओळखणार? तर, काय करते आहेस? (प्रमाण) - काय करून ऱ्हायली? (नागपुरी बोली), नदी (प्रमाण मराठी) - न्हंय (कोंकणी), नारळ, केळी (प्रमाण)- नारय, केयी (अहिराणी), महिना (प्रमाण) - मिहिना (डांगी) इत्यादी. बोलीमध्ये सहजपणे ‌‘मेला‌’, ‌‘खलास झाला‌’ असा शब्द वापरला जातो. तर प्रमाणभाषेत ‌‘वारला‌’, ‌‘देवाज्ञा झाली‌’, ‌‘कैलासवासी झाला‌’ असे म्हणतात अशा पद्धतीने प्रमाणभाषा आणि बोली स्पष्ट करता येते. प्रमाणभाषा असो वा बोलीभाषा; त्यातून तयार होणाऱ्या शब्दांनीच भाषा वाढते, पुढे जाते म्हणून दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
आता भाषा म्हटलं की, अक्षरे आली, शब्द आले आणि व्याकरणही आले. अक्षर म्हणजे जे क्षर नाही म्हणजे जे नाश पावत नाही ते. ज्यांचा पूर्ण उच्चार होतो (म्हणजे जे मध्येच तुटत नाहीत) ते वर्ण म्हणजे अक्षर. अक्षरओळख असणे म्हणजे वाचता-लिहिता येणे, ते न आल्यास अशा माणसाला ‌‘निरक्षर‌’ किंवा ‌‘अक्षरशून्य‌’ म्हणतात. आजकाल वेगवेगळ्या शैलीत अक्षरे लिहिण्याची कला दिसते; तिला अक्षरलेखनकला (कॅलिग्राफी) म्हणतात. एक किंवा अनेक अक्षरे एकत्र येऊन शब्द तयार होतात. आपण ‌‘शब्द हे शस्त्र आहे‌’, असे म्हणतो -म्हणजेच शब्दांचा वापर करताना आपण काळजी घ्यायला हवी. योग्य शब्द वापरले, तर काम चांगले होते; पण त्यात हयगय केली, तर नाती तुटतात, अडचणी उभ्या राहतात, गोंधळ माजतो. म्हणून व्याकरण समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे. व्याकरण हा संस्कृत शब्द आहे. हिंदीत त्याला ‌‘शब्दानुशासन‌’ असेही म्हणतात; कारण व्याकरणातल्या नियमांमुळे आपल्याला एखाद्या शब्दाचा वापर कसा, कधी, कुठे करावा किंवा करू नये हे आपल्याला कळते. जशी शरीराचे अनेक अंगे असतात आणि त्याचा अभ्यास केला, तर शरीराचे शास्त्र कळते; तसेच भाषेच्याही अनेक अंगांचा विचार व्याकरणातून केला जातो.
‌‘शब्दा‌’वरून काही वाक्प्रचार आणि म्हणी -
शब्द लागू देणे - दोष पत्करणे, दोषास प्राप्त होणे
शब्द खाली न पडणे - शब्दाला किंमत देणे, शब्द मानणे, शब्दाप्रमाणे वागणे, आज्ञा मान्य करणे.
मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा - आपल्याला एखादे काम करून घ्यायचे असल्यास योग्य मनुष्याकडेच मदत मागावी, इतरांच्या पुढे तोंड वेंगाडू नये. तसेच आपल्याला जसे काम असेल तशा प्रकारचे लाकूड असलेले झाडच तोडावे.
संस्कृत भाषेला ‌‘गीर्वाण‌’ म्हणजे देवांपासून निर्माण झालेली भाषा म्हणतात. कारण ती वेदांची, ग्रंथांची भाषा आहे. त्यातून पुढे प्राकृत भाषा आणि मग मराठी (महाराष्ट्राची - मरहट्टाची भाषा) निर्माण झाली असे मानतात. पुढे जसजशी आक्रमणे झाली, संस्कृतीची देवाण-घेवाण झाली तशी त्यात कानडी, पाली, हिन्दी, फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्रजी वगैरे अनेक भाषा मिसळत गेल्या. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे अनेक प्रदेशांप्रमाणे वऱ्हाडी, कोकणी, माणदेशी, मालवणी, अहिराणी, खानदेशी वगैरे बोलीभाषा, तर गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया या पोटभाषाही आहेत. यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. यातल्या ज्या भाषा लोकव्यवहारात आहेत, रूढ आहेत त्यांना ‌‘जिवंत भाषा‌’ म्हणतात; तर एखादी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरात नसेल, केवळ ग्रंथांमध्ये आढळत असेल, तर तिला ‌‘मृतभाषा‌’ म्हणतात. उदाहरणार्थ, ग्रीक, इजिप्ती, असुरी भाषा.
ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‌‘मराठी भाषा गौरवदिन‌’ म्हणून साजरा केला जातो; तसेच दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणून 1 मे हा दिवस ‌‘राजभाषा मराठी दिन‌’ म्हणून साजरा केला जातो.
तुमची,
नेहाताई
-नेहा लिमये

Powered By Sangraha 9.0