मेंदूतली मातृभाषा

23 Feb 2025 19:00:00

 


mendutali matrubhasha

बाळाच्या जन्मापासून त्याच्या कानावर अगदी सहजपणे जी भाषा येते, ती त्याची मातृभाषा असते, असं आपण सर्वसाधारणपणे समजतो. मात्र, बाळ पोटात असताना त्याची आई जी भाषा बोलते ती त्या बाळाची मातृभाषा असते, अशी मांडणी मेंदूचे संशोधक करत आहेत. याचं कारण आई जी भाषा बोलते, ती बाळ स्पष्टपणे ऐकू शकतं.

इतर माणसं जे बोलतात ते बाळाला अस्पष्ट ऐकू येत असतं. आई जर एकापेक्षा जास्त भाषा बोलत असेल, तर त्या भाषासुद्धा बाळ सहजपणे आत्मसात करू शकतं. बाळ जन्माला आल्यावर त्याला इतरांचे आवाजही स्पष्टपणे ऐकू येतात. घरात बोलली जाणारी भाषा ते बाळ अगदी सहजपणे शिकतं.

जी मुलं नॉर्मल असतात, मेंदूत कोणतीही गुंतागुंतीची समस्या नसते, ती मुलं जन्मल्यापासून ते पहिल्या दोन वर्षांत घरात बोलली जाणारी किमान एक भाषा पूर्णपणे बोलायला शिकतात. अगदी त्यातलं व्याकरण, विशिष्ट उच्चार, उच्चारांची लकब आणि आवाजात चढ-उतार आणणं हीसुद्धा प्रत्येक भाषेची खासियत असते. त्यासह मूल स्वत:ची मातृभाषा आत्मसात करतं. वयाची पहिली दोन वर्षं भाषाशिक्षणासाठी चांगली असतात. मूल अगदी सहजपणे भाषा शिकतं.

या काळात आसपासचे सर्व आवाज मुलांचे कान टिपत असतात. घरच्या, शेजारच्या माणसांकडून, नातेवाईकांकडून ज्या भाषा सहजरित्या मुलांच्या कानावर पडतात, त्या त्यांना बोलता येऊ शकतात. नवीन शब्द, नवीन शब्दांचा वापर, उच्चार करत असताना मूल कितीदा तरी चुकतं, पण चुकलं तरी ती चूक सुधारून आपली भाषा स्वत:हून सुधारतं. मेंदूमध्ये ही नैसर्गिक यंत्रणा आहे.

आपण कोणत्या भाषेत बोलायचं, शिकायचं, व्यक्त व्हायचं हे ती व्यक्ती ठरवते किंवा सुरुवातीच्या काळात हा निर्णय त्या-त्या घराचा असतो. एकीकडे भाषा ही कमालीची वैयक्तिक असते. कारण कोणत्या भाषेत विचार करायचा हा सर्वस्वी त्या-त्या व्यक्तीचा निर्णय असतो; पण त्याच वेळी भाषा ही संवाद, शिक्षण, समाज, संस्कृती, व्यवसाय, ज्ञान आणि एकूण परंपरा यांच्याशी जोडलेली असते. सध्याच्या काळात - विशेषत: इंग्रजीची गरज, त्या माध्यमातून शिक्षणाची गरज सुरू झाल्यापासून - बघायचं तर, हा विषय आपल्या घरापासून सुरू होतो, ते थेट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातो. म्हणून हा विषय फार महत्त्वाचा आहे. हे काम मेंदूची यंत्रणा व्यवस्थित करते. या सर्व प्रक्रियेला कारणीभूत काही अवयव असतात.

पंचेद्रियांची मदत

कान हे आपलं महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय. कानांवाटे मेंदूत पोहोचलेल्या ध्वनीलहरी आणि ऑडिटरी कॉर्टेक्सचा यात महत्त्वाचा सहभाग असतो. बोलताना चेहऱ्यावरचे हावभाव, हातवाऱ्यांंचा उपयोग केला जातो. त्यामुळे भाषेची जडणघडण होताना डोळ्यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असती. त्याचबरोबर भाषा समृद्ध होण्यासाठी त्वचा, जीभ, नाक यांचीही मदत होते. कारण विशिष्ट चव, विशिष्ट स्पर्श, विशिष्ट गंध याबद्दल परिपूर्ण माहिती आपल्याला ही सर्व इंद्रिय देत असतात. त्यामुळे भाषा समजण्यासाठी पाचही इंद्रिय महत्त्वाची असतात.

ब्रोका आणि वर्निक

भाषा शिकण्यासाठी मेंदूतले ब्रोका आणि वर्निक ही दोन क्षेत्रे महत्त्वाची आहेत. मूल जन्माला येतं तेव्हापासून मेंदूतलं वर्निक हे क्षेत्र काम करत असतं. वर्निक हे भाषा आकलनाचं क्षेत्र आहे. ब्रोका हे भाषा निर्मितीचं क्षेत्र आहे. आसपासची माणसं ज्या भाषेत बोलतात, त्यातले शब्द वर्निक या क्षेत्रात साठवले जातात. वयाच्या साधारणत: वर्ष-दीड वर्षापर्यंत ब्रोका क्षेत्र विकसित होतं. त्यानंतर बोलणं सुरू होतं. जी भाषा, जे शब्द आतापर्यंत वर्निकमध्ये साठवले गेले आहेत, तेच शब्द आणि तीच भाषा मूल बोलतं. ऐकलेल्या भाषेशिवाय दुसरं काहीही मूल बोलत नाही. इथे मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित होतं. मेंदूत सर्वप्रथम ही भाषा साठवलेली असते.

प्रत्येक बाळाचा मुलाचा ब्रोका विकसित होण्याचा वेळ वेगवेगळा असतो. मुलांच्या आसपास जे काही बोललं जाईल, त्यामुळे मुलांची भाषा पहिल्या दोन-अडीच वर्षांत चांगली विकसित होते. याउलट ज्या मुलांच्या कानावर भाषा फारशी पडत नाही. त्यांचा भाषेचा विकास सीमित होतो.

या संपूर्ण काळात मुलं स्वत:हून भाषा आत्मसात करत असतात; कोणीतरी शिकवतं आहे, म्हणून ते शिकत नसतात. त्यामुळे मुद्दाम शिकवायला जाऊ नये. दुसऱ्या भाषा शिकण्यासाठी सक्ती आणि जबरदस्ती केली, तर मूल सहजपणे भाषा आत्मसात करू शकणार नाही. मेंदूची ही क्षमता लक्षात घ्यायला हवी.

आपल्याकडे इतर माध्यमांतून शिक्षण घ्यायची मुलांवर सक्ती केली जाते. एवढंच नाही, तर मुलं शिकताना चुकली किंवा इंग्रजीखेरीज स्वत:च्या मातृभाषेत बोलली, तर शिक्षादेखील केल्या जातात. त्या वेळी या शाळांच्या हे लक्षात येत नाही की, यामुळे मुलांच्या मातृभाषेवरच आघात होत असतो. जे अत्यंत चुकीचं आहे.

दूरगामी परिणाम बघितल्यास विचारप्रक्रियेवर आणि एकूणच शिक्षणप्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. यासाठी मातृभाषेतून शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञानरचनावादाचा सिद्धांत हेच सांगतो की, पूर्वज्ञानावर आधारित नव्या माहितीची रचना आपला मेंदू करत असतो. याच पद्धतीने आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही कला शिकत असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाला सहजपणे काही माहिती मिळालेली असते. हे असतं आपलं मातृभाषेतलं पूर्वज्ञान.

मेंदूच्या पूर्वज्ञानाच्या कप्प्यात लहानपणापासून बरीच माहिती जमलेली असते. प्राथमिक शिक्षणात बहुतेक मूलभूत संबोध मुलांना शिकायचे असतात-आत्मसात करायचे असतात. या संबंधांवर पुढच्या शिक्षणाची दिशा ठरणार असते. गणितातले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भाषांचे वाचन आणि लेखन, विज्ञानातल्या संकल्पना शिकायच्या असतात. या पूर्वज्ञानाच्या आधारावर नवे अनुभव रचून त्यासाठी नवे कष्ट घेऊन पुढचं शिक्षण घडणार असतं. इथे त्यांचं पूर्वज्ञान म्हणजे त्यांची मातृभाषा आहे. हे सर्व शिकणं सोपं व्हावं, यासाठी मातृभाषेतून शिक्षण असायला हवं.

सर्व प्रगत देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं. यामुळे मुलं सहजपणे आत्मसात करतात. अनेक यूरोपीयन शिक्षणतज्ज्ञांनी मातृभाषेतून शिक्षण असावं, हे नमूद केलं आहे. यावर आधारित संशोधनं केली आहेत. जगभरातली अनेक संशोधनं हेच सांगतात की, मातृभाषेत शिक्षण घ्यायला हवं. मेंदूसाठी ते सोपं आणि सहज आहे. आपल्याकडे मात्र - पूर्ण भारतातच मुलांना स्वत:ची मातृभाषा बाजूला ठेवून इंग्रजीत शिकणं क्रमप्राप्त ठरत आहे. इतर भाषा शिकणं आणि इतर भाषांतून संकल्पना स्पष्ट होणं - ही वाट अवघड आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेत शिक्षण द्यावे यावर भर दिलेला आहे. ही फार ठळक गोष्ट आहे. यामुळे आदिवासी बोलीसुद्धा या परिघात येऊ शकतात. त्याच बरोबर धोरणात, ‌‘जिथे शक्य आहे, तिथे मातृभाषेत शिक्षण द्यावे‌’, असं एक विधानही करून ठेवलं आहे. त्यामुळे शक्य नाही असं दाखवून किंवा अन्य काही कारणं दाखवून मातृभाषेला वळसा घालून इंग्रजी शिक्षण रेटूसुद्धा शकतात. मात्र, यात हानी आहे, हे नाकारता येत नाही.

डॉ. श्रुती पानसे

Powered By Sangraha 9.0