
जगभरात आतापर्यंत भाषेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे. त्या अभ्यासातून एक गोष्ट कळली, ती म्हणजे जगभरात जवळपास ६५०० विविध भाषा विविध प्रांतात विविध लोकांकडून बोलल्या जातात. युरोप, आशिया, आफ्रिका अशा अनेक खंडात बोलीभाषा म्हणूनही अनेक भाषा आहेत. एकट्या आपल्या भारतात १८० भाषा बोलल्या जातात. या भाषा कशा जन्माला आल्यात, त्यांचा उगम नक्की कसा झाला? याचा मागोवा आपण या लेखातून करून घेऊ या. पुरातत्त्व अभ्यासात आपण मागे पाहिल्याप्रमाणे अनेक पुरावे उत्खनन करून समोर येत असतात. त्यांचा अभ्यास करून मग त्या काळी असलेल्या माणसांचा, त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास केला जातो; परंतु भाषेचा उगम कसा झाला याबाबत पुरावा मात्रा पुरातत्त्वीय उत्खननातून मिळू शकत नाही. कारण भाषा काही सजीव किंवा डोळ्यांना दिसणारी वस्तू नाही.
भाषा केवळ माणसाचीच असते, असं नाही. निसर्गात असणाऱ्या अनेक गोष्टी एकमेकांशी विविध माध्यमांतून संवाद साधत असतात. वाहणारा वारा हा मोठ्या झाडाच्या सावलीतून, पानांमधून वाहत जातो, तेव्हा त्याचा कुठेतरी त्या झाडांच्या पानांशी संवाद होतच असतो. त्यातून आवाज निर्माण होतो, ज्याला आपण पानांची सळसळ म्हणतो. हासुद्धा निसर्गाचा निसर्गाशी झालेला संवादच आहे. माणूस अशा प्रकारच्या अनेक गोष्टी निरीक्षणातून शिकत असतो. अगदी अश्मयुगापासून माणूस निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्याशी संवाद साधून मोठा, विकसित किंवा प्रगतीशील झाला आहे. अगदी माकड स्वरूपात असल्यापासून माणूस एकमेकांशी विविध आवाज काढून संवाद साधायचा प्रयत्न करतो आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. आतासुद्धा माकडे किंवा इतर कोणताही प्राणी काही ना काही आवाज काढून एकमेकांशी बोलत असतात. संवाद साधण्यासाठी फक्त आवाज काढता यायला हवा असंही नाही हे माणसाला जाणवलं.
माणसाचा विकास होणे सुरू झाल्यावर त्याला जाणीव झाली की, फक्त तोंडातून आवाज काढूनच नाही, तर हातवारे किंवा शारीरिक हालचाल करूनसुद्धा आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. या जाणिवेतूनच माणसाला साधारणपणे १८ ते १२ लाख वर्षापूव ‘सांकेतिक भाषे’चा शोध लागला असावा असे वाटते. आतासुद्धा कोणाला ‘इकडे ये’, असं म्हणायचं असेल तर, आपण इकडे ये असे शब्द वापरण्यापेक्षा हाताने खूण करून त्याला तसं सांगू शकतो. ही सांकेतिक भाषा हे एक प्रकारचे एकमेकांशी संवाद साधण्याचे माध्यम होते. त्याच्यानंतर गेल्या लेखात पाहिल्याप्रमाणे साधारणपणे इसवी सनपूर्व २०,००० च्या आसपास माणसाच्या आयुष्यात थोड्या फार प्रमाणात स्थैर्यता यायला लागली. दगडी हत्यारांमध्ये झालेले बदल आणि त्यामुळे शिकार करण्यात आलेली सुलभता यामुळे माणसाच्या वैयक्तिक जीवनावर आणि सामाजिक जीवनावर खूप बदल घडून यायला लागले. माणसाला भरपूर मोकळा वेळ मिळायला लागला. मिळालेल्या वेळेचा माणसाने सदुपयोग केला आणि स्वतःला चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करू लागला. प्राचीन काळी तोंडातून आवाज काढण्याची सवय कुठे तरी माणसाला लागली असावी, त्यानंतर सांकेतिक भाषा आली, नंतर चित्ररूपात तो संवाद करायला लागला. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना त्याने चित्ररूपात रंगवून किंवा कोरून ठेवल्या आहेत. चित्र रंगवणे हीसुद्धा एक प्रकारची भाषाच होती, असे म्हणायला हरकत नाही. त्या माध्यमातुन तो इतर लोकांशी बोलू शकत होता. ह्यातूनच पुढे कदाचित ‘लिपी’चा म्हणजेच लिहिण्याचा शोध लागला असावा. सर्वांत महत्वाचं म्हणजे आपण आधी हे समजून घेतलं पाहिजं की, लिपी आणि भाषेत फरक आहे. मोबाईलवर ‘काय रे कसा आहेस?’ हे टाईप करताना आपण रोमन लिपीमध्ये ते लिहितो; पण भाषा मराठी असते.
प्राचीन काळी नक्की कोणती भाषा बोलली जात होती यावर अजून अभ्यास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची उत्तरंसुद्धा लवकर मिळतील असे नाही. प्राचीन काळानंतर आलेला कालखंड म्हणजे साधरणपणे आतापासून ६००० वर्षं जुना. धातूचा शोध लागला आणि मग माणसाची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली, असे दिसून येते. सिंधू संस्कृतीच्या काळातसुद्धा त्यांची अशी वेगळी लिपी होतीच; परंतु त्यांची भाषा काय असावी ह्याबाबत मात्र नक्की पुरावे आपल्याकडे नाहीत.
सिंधू संस्कृतीच्या नंतर ऋग्वेद, यजुर्वेद म्हणजेच वैदिक कालखंड आला, तेव्हा मात्र लिहिलेली सगळी ‘सुक्ते’ही संस्कृत भाषेत आहेत असे दिसते. त्यानंतर विविध राज्य स्थापन झाली आणि संस्कृत ही राजभाषा म्हणजेच राजाच्या व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा म्हणून नावारूपाला आली. सोबतच भौगोलिक भागानुसार संस्कृतच्या बरोबरीने वेगवेगळ्या भाषा बोलल्या जाऊ लागल्या त्यांना आपण प्राकृत असे म्हणतो. संस्कुत, प्राकृत भाषा लिहिण्यासाठी विविध लिपींचा वापर व्हायला लागला. ह्या प्राकृत आणि संस्कृतच्या मिश्रणातूनच पुढे विविध भाषा बोलल्या जाऊ लागल्या. विविध भागांतल्या अनेक राजघराण्यांनी भाषांना राजकीय पाठबळ दिले आणि त्या भाषांचा पुढे विकास झाला. जसे की चोल, पांड्य यांनी तमिळ भाषेला महत्त्व दिले. मौर्य घराण्याने प्राकृतला महत्त्व दिले.
इसवी सन चैौथ्या शतकात गुप्त राजघराण्याने संस्कृत भाषेला महत्त्वाचा वेगळा दर्जा दिला. कालिदास, भास यांसारख्या अनेक कवींनी संस्कृत भाषेला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. आजही संस्कृत भाषा दक्षिणेत मोठ्या प्रमाणात बोलली जाते. मराठी भाषेचा उगम हा महाराष्ट्री (संस्कृत भाषेशी समान जाणारी; परंतु महाराष्ट्रात बोलली जाणारी) ह्या भाषेतून झाला असावा असे वाटते. आद्य मराठीचा ताम्रपट सातारा जिल्ह्यात सापडला आहे, असे म्हटले जाते इसवी सन ७३१ अशी नोंद त्यावर दिसते. त्यानंतर यादव ह्या राजघराण्याने मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. भारतात अशा अनेक भाषा बोलल्या जातात; परंतु, आता काही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. भाषेचा उगम, स्वर, व्यंजन आणि त्या सगळ्याचा प्रसार ह्यावर अभ्यास करणारे एक महत्त्वाचे शास्त्र आपल्याकडे सध्या वेगाने प्रसिद्ध होत आहे ते म्हणजे भाषाशास्त्र.
- ऋत्विज आपटे