होळी हा मोठा आनंदाचा सण! फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण हा सण साजरा करतो. संध्याकाळच्या वेळी होळी पेटविली जाते. तिची पूजा केली जाते. सर्व जण होळीला नैवेद्य दाखवितात. प्रदक्षिणा घालतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी व रंगपंचमीला रंग उडविण्याची धमाल असते. विविध प्रकारचे रंग, तसेच गुलाल उडवितात. सारे जीवन कसे रंगीत होऊन जाते !
स्वागत वसंत ऋतूचे !
निसर्गातही या काळात मोठा सुंदर बदल होत असतो. पावसाळा संपून गेलेला असतो. आभाळ निरभ्र असते. थंडीही असते हवेत, पण थंडी किंवा हिवाळा आता निरोप घेण्याच्या वाटेवर असतो. पहाटे, सकाळी छान गारवा अन दुपारी मात्र जाणवेल असा उकाडा! अशी मोठी गमतीशीर हवा असते. सकाळी आणि संध्याकाळी क्षितिजावर रंगांची उधळण अगदी बघण्यासारखी असते. निसर्गातील ही विविध रंगांची दुनिया माणसाला खुणावते आणि आपल्याही जीवनात आपण रंगपंचमी साजरी करतो.
त्याच वेळी सकाळी कोकिळचा मधुर पुकारा, आर्त पुकारा कानावर पडतो. कोकिळच्या नादमधुर सादप्रतिसादातून सगळी सकाळच प्रसन्न होऊन जाते. आपल्याला कोणीतरी सांगत, "आला, वसंत ऋतु आला!’’ आसमंतात कुठूनतरी छानपैकी अंबेचा मोहराचा सुगंध टाकतो. कवी चंद्रशेकर जणू आपल्या कानात कुजबुजतात, 'आला वसंत, कविकोकिल हाहि आला!' वसंत ऋतूची चाहूल, फाल्गुन मास आणि होळी पौर्णिमा असे हातात हात घालून जणू फेर धरून नाचतात. जणू ते म्हणतात,
'आली होळी आली!
आली रंगपंचमी ही आली!'
भूमी व अग्नी यांच्याबद्दल कृतज्ञता !
होळी सण म्हणजे अवघ्या भारताचा एक लोकोत्सव आहे. भिन्न भिन्न राज्यांत त्याची भिन्न रूपे दिसतात. उत्तरेत याला 'होलायात्रा' म्हणतात. कोकणात, महाराष्ट्रात याला 'शिमगा', 'होळी' अशी नावे आहेत. दक्षिणेत 'कामदहन' या स्वरूपात तो साजरा होता. माघ महिन्याच्या पौर्णिमेचे नाव आहे 'नव्याची पुनव' - म्हणजे नवीन धान्याचा पौर्णिमा. आपली जमीन, भूमी आपल्याला भरभरून धान्य देते. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपले शेतकरी बांधव नव्याची पुनव साजरी करतात. नवे धान्य, नवी पिके आणि आपली भूमीमाता यांची पूजा करतात. माघ महिन्यापासून वातावरणात सुंदर बदल होत जातात. त्याची परिणती अगदी सहजपणे होळी सणामध्ये होती.
आपल्या सणाचा आणि उत्सवाचा सबंध हा आपल्या खेड्यातील जीवनाशी आहे. आपली ग्रामसस्कृती व कृषिसंस्कृती यांचा प्रदीर्घ वारसा घेऊन आपण आजचे आधुनिक जीवन जगत आहोत. त्यामुळे आपले शहरवासी या सणांचा, उत्सवांचा संबंध आपल्या खेड्यातील जीवनाशी कसा आहे? असे कुतूहलाने विचारतात. आपण ते समजून घेतले म्हणजे आपल्या लक्षात येईल की, आपले शेतकरी बांधव, त्यांचा शेती हा व्यवसाय, त्यांचे खेड्यातील कष्ट य जीवन, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या परंपरा, त्यांच्याकडे चालत आलेला कृषी संस्कृतीचा वारसा हे सारे खूप अभिमानास्पद आहे. हे समजून घेतले की शहर व खेडे यातील दरी दूर होईल आणि 'आपण सारे एक' ही ऊर्मी आपल्याला आनंददायक वाटेल.
वसंत ऋतूच्या स्वागताबरोबरच रंगोत्सव, मदनोत्सव साजरा होतो. भूमी आणि अग्नी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
आपल्या संस्कृतीचा वारसा
परंपरेने हा सण साजरा करण्याची सुंदर रीत रूढ आहे. वैदिक काळापासून होळीची परंपरा आपल्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली आहे, कारण ती कृषी जीवनाची देणगी आहे. ऋतुपरिवर्तनाशी व सुगीशी आपले सण जोडलेले आहेत. म्हणून होळीचा सण हा नवीन अन्नाचा यज्ञसोहळा असावा असे वाटते, अशा सुंदर शब्दांमध्ये प्रा. डॉ. द.ता. भोसले यांनी आपल्या 'लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष' या ग्रंथात या सणाच्या परंपरेचे नाते सांगितले आहे. ते आपल्याला सांगतात, 'प्राचीन काळी शिशिराच्या अखेरीला शेतीमध्ये पिके तयार झाल्यावर 'सस्येष्टी' नावाचा कृषियज्ञ केला जात होता. या यज्ञाद्वारे शेतकरी नव्या धान्याचा काही हिस्सा अग्नीला अर्पण करून मगच स्वतः खाण्यास प्रारंभ करीत असे. या काळात ज्वारी, गहू, हरभरा यांचे नवीन पीक आलेले असते. त्यांचा उपभोग घेण्यापूर्वी हे पीक यज्ञदेवतेला अर्पण केल्याशिवाय त्यांचा वापर करावयाचा नाही, अशी आजही शेतकऱ्यांची धारणा आढळते. म्हणून फाल्गुन पौर्णिमेला अग्नीची विधिवत स्थापना करून पूजा केली जाते. त्यात गव्हाच्या ओंब्या अर्पण केल्या जातात. गव्हाची व हरभऱ्याची पेंढी या अग्नीवर थोडीशी भाजली जाते, ती प्रसाद म्हणून वाटली जाते आणि उरलेले धान्य घरी नेले जाते. या धान्यात अग्नीचा प्राण समाविष्ट झालेला असतो, अशी लोकमनाची धारणा आहे. हे धान्य अंगणात ठेवून त्याला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवितात व तो मुलांना वाटतात. या फाल्गुन पौर्णिमेला वैश्वदेव पर्वाच्या पवित्र अग्नीमध्ये भाजले जाणाऱ्या अन्नास 'होलक' असे म्हणतात. यावरूनच या सणास होलिकोत्सव असे नाव मिळाले. अग्नी व भूमी यांच्याबद्दलची ही कृतज्ञता आपणही मनात ठेवू या!
संयमाचे, सौजनयाचे व सुसंस्कृतपणाचे महत्व
आज पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जंगलतोड करून होळी साजरी करायची का? याचा विचार करू या. तसेच रंगांचा उत्सव साजरा करतानाही आपण संयम, सौजन्य याचे भान ठेवू या. जे रंग वापरले जातात, त्यांची काळजीपूर्वक निवड करा. त्यामुळे आपल्याला व इतरांनाही अपाय होणार नाही, याची काळजी घ्या. आपण आनंद साजरा करताना इतरांना दुःख होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे सुसंस्कृतपणा. आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट या वर्षीपासून करू या, ती म्हणजे पाण्याचा काळजीपूर्वक व काटकसरीने वापर करणे होय. आपल्या राज्यात दुष्काळ पडलेला असताना, पाण्याचा वापर कसा करायचा हे आपणच ठरवायला हवे.
तर मित्रांनो, होळी, रंगपंचमी या सणांच्या निमित्ताने आपण आपल्या संस्कृतीचा, उदात्त इतिहासाचा, आपल्या समाजाचा आपण विचार करू या. आनंदाने व सभ्यतेने सण साजरे करण्याचा निश्चय करताना परस्परांना म्हणू या, 'सर्वांना होळीच्या शुभेच्छा!'
-श्रीराम वा. कुलकर्णी