पळस

14 Mar 2025 07:00:00


palas

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्याचे शास्त्रीय नाव Butea monosperma असे आहे व रोजच्या वापरातले नाव पळस आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याच्या पानांचा वापर होतो. भारतात या झाडास वसंत ऋतूत (होळीच्या सुमारास) गर्द पिवळ्या, केशरी रंगाची फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया या दिवशी याच्या पत्रावळींचा वापर विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात होतो. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समूहातच असतात, यावरून पळसाला पाने तीनच ही म्हण मराठी भाषेत रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार आणि रंग असतो. संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते. सुकलेल्या फुलांचा पिवळा रंग शक्तिवर्धक म्हणून आणि अतिसार व उदरवायू व विकारांवर पळस औषध म्हणून वापरलं जातं. सर्दी खोकाल्यावरही पळसाचा काढा घेतात. ज्याठिकाणी पळस आणि बोर एकत्र पाहायला मिळतात, तिथे पाणी असतं असं म्हणतात.

ही वनस्पती बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हियेतनाम, मलेशिया आणि पश्चिम इंडोनेशियामध्ये वाढते.

हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

Powered By Sangraha 9.0