शिशिर ऋतूत थंडीमुळे सगळीकडे वृक्षांची पानगळ झालेली असते. पर्णहीन जंगल ओके-बोकं दिसतं. सगळं वातावरण कसं उदास, काहीसं कठोर.., आणि मग फाल्गुन महिना अवतरताच थंडीची लाट कमी झाली, बाताबरणातलं तापमान वाढू लागलं की निसर्गालाही जाग येते, बसंत अवतरतो आणि आसमंत उत्साहाने, नवचैतन्याने भरून जातो. जंगलात तर धम्मालच असते, काटेसावरीची लालभडक फुलं, पळसाची ज्योतीसारखी लालसर केशरी, पांगाऱ्याची अशीच लाल गुलाबी-केशरी फुलं, बहाव्याची सोनेरी झुंबर ज्या वृक्षांना आता पुलं लागत नाही, ते पालवीच्या नवनवीन रंगांनी फुलांची कमतरता भरून काढतात. रंग बदलणारी पिंपळाची कोवळी पालवी कधी बघितली आहे? तुकतुकीत गडद गुलाबी, मग हलकी गुलाबी, मग पोपटी आणि शेवटी गडद हिरवी पानं. कदाचित मनुष्यानेदेखील या निसर्गाच्या रंगांना स्वतःवर उतरवून घ्यायला रंगपंचमीचा सण सुरू केला असावा. आमचं बालपण नागपूरला गेलं. गावाची वेस ओलांडली की रान लागत असे आणि त्यात पळसा वृक्ष फुललेले असायचे. हीच फुलं आणून त्याचा रंग आम्ही वापरत असू. लाल रंगासाठी हळदीपासून तयार केलेला अबीर असायचा आणि पांढरा रंग... आदल्या दिवशीच्या होलिकादहन केलेल्या होळीचा राखेचा. त्या वेळी पालकांना रंगपंचमीची भीती वाटत नसे; कारण हे सगळे रंग केवळ नैसर्गिकच नव्हे, तर औषधीही होते. त्यामुळे इडा-पिडा रोगराई निघून जात. याउलट आज माझी लेक जेव्हा रंग खेळायला जायला निघते, तेव्हा माझ्या मनात जरा भीती असते; कारण या होळीचं इतकं बाजारीकरण झालं आहे. रंग म्हणून अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्यात Lead Oxide, copper Sulphate, Aluminium, Bromide यासारखी घातक द्रव्यंदेखील असतात. यामुळे संभाव्य धोका म्हणजे अनेक प्रकारच्या अॅलर्जी, त्वचारोग, डोळ्यांचे विकार, त्याचबरोबर पाण्याचा प्रचंड प्रमाणात होणारा अपव्यय, थेट चीनहून आलेल्या भल्या मोठ्या पिचकाऱ्या आणि Plastic कचऱ्यात पडणारी भर, हे प्रश्नदेखील आहेतच. (होळी पेटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडाचं काही बोलायलाच नको.)
आनंदाची बाब म्हणजे, अनेक लोकांना आता पर्यावरणस्नेही होळीचं महत्त्व पटायला लागलं आहे. लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी नैसर्गिक पर्याय आहेत आणि ते स्वतः तयार करण्यात जास्त आनंद आहे, हेही पटलं आहे. त्यामुळे रंगांच्या या सोहळ्यात अजून रंग भरला आहे असं म्हणता येईल.
नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळसाची फुलं, हळद, साबण, झेंडूची फुलं, कांद्याची सालं, डाळिंबाची सालं वापरून बघा !
-अंजना देवस्थळे
उद्यानविज्ञान तज्ज्ञ