रंगांची दुनिया...

15 Mar 2025 19:00:00


रंगांची दुनिया...

रंगांची विविधता, छटा, त्यांचा ताजेपणा आपल्याला आवडतोच. रंगहीन असे काही आपल्याला आवडत नाही. आपला निसर्ग म्हणजे रंगांची दुनियाच! या रंगांच्या दुनियेतील अनुभव सांगतेय चित्रकार रश्मी ताई..
सुंदरशा रविवारच्या सकाळी माझं स्वागत हिमवर्षावाने केलं. हातातल्या वाफाळत्या कडक आल्याच्या चहाबरोबर मी सभोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करत होते. थेट आकाशातून वाऱ्यावर स्वार होऊन एखाद्या नर्तकीच्या पदन्यासाची आठवण करून देत हिमकण पृथ्वीकडे अनावर ओढीने झेपावत होते आणि पृथ्वीच्या मिठीमध्ये विसावताच विरघळून जात होते. माझ्या बागेतली छोटीशी पायवाट पाहतापाहता अदृश्य झाली आणि धवलतेची शाल पांघरून गुडूप झाली. रस्त्यावरच्या रंगीत वाहनांचं अस्तित्व क्षणार्धात हरवलं आणि त्याचबरोबर माझंसुद्धा !
माझ्या मनात एक विचार चमकून गेला.. सही न सही असंच एखादं निसर्गचित्र काढता येईल मला? मी काही खूप मोठी कलाकार नाही, पण प्रयत्न करायला मला नक्कीच आवडेल. मग चित्र काढण्याच्या दृष्टीने मी सभोवतालच्या दृश्याकडे बघायला सुरुवात केली आणि लक्षात आलं, की इथे तर रंगच नाहीत. या चित्रामध्ये रंगांची दुनिया ही फक्त दोनच रंगांची.. काळा आणि पांढरा ! खरंच, हे जग या दोनच रंगांचं असलं असतं तर? आपल्याला समुद्राची निळाई भावली असती? क्षितिजाची रंगरेषा अनुभवता आली असती? सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात मुक्तपणे उडालेल्या रंगांच्या उधळणीला आपण नक्कीच मुकलो असतो. या इतक्या नितांत सुंदर आणि विविधतेने नटलेल्या निसर्गामध्ये आपला अधिवास किती सुखद आहे, असा विचारही अनेकांच्या मनात येत नसेल; कारण हे अनमोल लेणं आपण जन्मतः पाहतोय आणि हे रंगसौंदर्य आपल्याला सवयीचं झालंय... पण मग, धवल आणि कृष्ण हे नक्की काय आहे? रंगांचं सौंदर्य या दोन्ही रंगांत नाही की काय ? मग एक विचार असाही आला की, सर्व रंगांचं अस्तित्व असणं म्हणजे 'धवतला-उत्साह' आणि रंगांचं अस्तित्वच मरणं म्हणजे 'कृष्णातली-उदासीनता'.
विविध रंगांच्या फुलांची चित्र किंवा उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची रंगहीन चित्रं पाहणं म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखंच आहे. रंगहीन निसर्ग असता, तर आपलं जीवन चैतन्यमय झालंच नसतं. दोन फळांमधील फरकही समजला नसता. माणसाचा रंग गव्हाळ, गोरा की काळा हेसुद्धा समजलं नसतं आणि मग रंगांमुळे होणारा भेदभाव मात्र नक्कीच झाला नसता. निसर्गातल्या सर्व आकृती एकमेकांत मिसळून गेल्या असत्या; इतक्या की, त्या ओळखणंही अवघड झालं असतं. भावनात्मक आणि मानसिक पातळीवरची एखादी आकृती काय आहे ? कशासाठी आहे? हे न समजल्यामुळे जग उदासीनतेच्या काळोखात बुडून गेलं असतं. यामध्येही काही लोकांना आनंद झाला असता, पण सर्वांनाच नाही; कारण रंगहीन चराचरात वावरणं म्हणजे चैतन्यहीन आयुष्य जगणं.
खरं तर निसर्ग हाच एक मोठा चित्रकार आहे, रंगकार आहे. रंगांची विविधता आणि त्याचा ताजेपणा चित्राच्या चौकटीमध्ये नाही बंद करता येत. मोरपिसातल्या निळ्या रंगाच्या अनंत छटा पाहिल्या की वाटतं, समुद्राची निळाई आणि आकाशाची निळाई यांतला फरक फक्त निसर्गच दाखवू शकतो. ही सारी रंगांची दुनिया ! रंगहीन निसर्ग असता, तर आपलं जीवन तेजहीन झालं असतं. रंगांमुळे प्रत्येक पदार्थ आपलं अस्तित्व टिकवून आहे. जर अस्तित्वच नाही, तर ते चित्रामध्ये कसं उतरवणार ! रंग म्हणजे उत्साह.. रंग म्हणजे चैतन्य.. रंग म्हणजे आनंद !
मनात आलेल्या विचारलहरींमध्ये खोलवर बुडालेली असतानाच मी हातात ब्रश घेतला आणि कॅनव्हासवर चित्र चितारू लागले. हो, पण रंगहीन नाही हं! माझ्या कॅनव्हासवर समोरचं बर्फाळ दृश्य हळूहळू आकार घेऊ लागलं होतं, पण एका कोपऱ्यात एक छोटसं हिरवं रोपटं आपलं अस्तित्व टिकवू पाहात होतं..
-रश्मी हिमांशू बर्वे

Powered By Sangraha 9.0