कोकणात खूप मोठ्या प्रमाणात आढळणारं झाड म्हणजे सुरंगीचं झाड. त्या सुरंगीच्या झाडाला लागणारे वळेसर अगदी सुगंधी म्हणजे त्याची फुले. या झाडाची खूप वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत जसे की याची फुले शेंड्याला न लागता चक्क झाडाच्या खोडाला लागतात. पिवळसर पांढऱ्या रंगाची ही फुले अतिशय सुगंधी असतात. ही फुले ऐन उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यातच उमलतात. ओबडधोबड वाटणारं आणि कळपट तपकिरी रंगाचं हे झाड आतल्या बाजुने फुलांनी भरून जाते व सगळ्या परिसरात सुगंध पसरवते. सगळ्या माणसांना तर हे झाड मोहित करतेच पण मधमाश्यांना आणि पक्ष्यांनाही ते सुगंधाने त्याच्याकडे येण्यास भाग पाडते. बाजारात जरी कोणी ह्या फुलांचा हार घेऊन विकायला बसलं तरी सोबत काही मधमाश्या आलेल्याच असतात, एवढी गोडी मधमाश्यांना त्या फुलाच्या प्रति असते.
सुरंगीची फुले खूप नाजूक असल्याने त्यांना खूप हळुवारपणे हाताळावे लागते. त्यांना अलगदपणे खोडावरून काढून त्याचा हार बनवला जातो तसेच कोकणातील लोक ते हार घेऊन विकण्यासाठी रस्त्यावर उभे असतात. जाणकार लोक आवर्जून ते हार घेतात. सुरंगीचं शास्त्रीय नाव Mammea Suriga असं असून गार्सिनिया कुळातलं हे झाड आहे. हे झाड सदाहरित असते व याची उंची १५ ते ३० फुटापर्यंत वाढते. काही ठिकाणी सुरंगीला ‘नागकेशर’ या नावानेही ओळखतात. बाजारात ही फुले जवळपास १२०० रुपये किलोने विकली जातात. सुरंगीचा ‘पर्फ्युम’ ही चांगला बनतो. हल्ली ही झाडे खूप कमी होत चालली आहेत म्हणून आपल्याला ही झाडे जपण्याची खूप गरज आहे.