मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की कॉम्पुटरचा माऊस गणपतीच्या उंदराला काय म्हणत असेल..? मी मोबाईल झालो तर किंवा मी स्कूटर झालो तर किंवा मी रॉकेट झालो तर असा तुमच्या मनात कधी विचार आलाय का? तुम्ही वाऱ्यामुळे झाडांना हलताना तर बघितलं असेलच; पण ती झाडं हलतात की हसतात असा विचार तुम्ही केलाय का? तुम्हाला कधी ढग जमिनीवर आल्याचे किंवा तुमचे ढगात घर असल्याचं स्वप्न पडलंय का? आकाशात जे वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात ते कोण रंगवतं असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का ?
तुम्हाला अंधाराची भीती वाटते का ?
वरील प्रश्नांपैकी बऱ्याच प्रश्नांना तुमचे उत्तर 'हो' असे असेल. मी तुम्हाला आता ज्या पुस्तकाची ओळख करून टेणार आहे. त्या पुस्तकात अशाच तुमच्याच मनातल्या भरपूर प्रश्नांवर कविता आहेत.
पुस्तकाचे नाव आहे 'बिच्चारा माऊस.' या सगळ्या कविता नीलिमा गुंडी यांनी लिहिल्या आहेत. या पुस्तकातल्या 'रंगांचा खेळ' आणि 'टंगळ-मंगळ' या कविता तुम्हाला विशेष आवडतील. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि वाचून झाल्यावर यातल्या कविता तुमच्या मित्रांना, पालकांना व तुमच्या शिक्षकांना नक्की ऐकवा.
- देवव्रत वाघ