किलबिलणारी कविता

शिक्षण विवेक    20-Apr-2025
Total Views |


किलबिलणारी कविता

आजोळच्या गोठ्यात तीच भुरी गाय

म्हणते, 'जरा शिंगाखाली खाजवशील काय ?'

असं लहान होऊन तुमच्याशी बोलायला येते ती शांता शेळके यांची कविता. छोट्यांचं भावविश्व साकारलं जाताना त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलणारं, गोष्टी सांगणारं कुणीतरी हवं असतंच. ‘झोपेचा गाव’ या शांता शेळकेंच्या काव्यसंग्रहात अशा अनेक कविता लहान मुलांशी संवाद साधतात.

झाडांतून पानांतून पाखरांची किलबिल

निळ्या निळ्या लाटांतून ऊन करी झिलमिल

कुणासाठी ? कुणासाठी ? तुझ्यासाठी, माझ्यासाठी !

असं म्हणत म्हणत झाडांतून, पाखरांच्या किलबिलण्यातून निसर्ग त्यांच्या अनेक कवितांतून डोकावत राहतो. मुलांच्या नव्या डोळ्यांसाठी सगळंच कसं नवं नवं असते. म्हणजे आभाळ नवं, त्यातला चांदोबाही नवाच, पक्षी नवे, झाड नवे. मग सगळ्यांसोबत कुणी तरी मैत्री करून द्यायला हवी ना! तर शांताबाईंच्या या कविता मुलांशी मैत्री करतात.

झाडाशी झाड पानाशी पान गवताशी गवत बोलते ना?

गालाला गाल भिडला तर फूल फूल खुशीत डोलते ना?

अशा प्रेमाने एकमेकांशी वागायला लावणाऱ्या कविता आहेत त्यांच्या. कधी असे अनेक प्रश्न विचारून मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देत राहते तीही त्यांची कविता. त्यांच्या कवितेत पाऊस, वारा येतो तसा बोकोबा, चांदोबा आणि वाघूनाना हेही येतात. ताई, आई, बाबा या जवळच्या व्यक्ती जशा येतात तशाच फुलपाखरू, रानपऱ्या यांच्यावरच्या कविताही येतात. पक्षी, प्राणी, नाती, वेगवेगळी वर्तनं अशा सगळ्यांतून खेळकर वृत्तीने त्या गट्टी घडवून आणतात.

या कवितांची भाषा अगदी मुलांना कळेल, त्यांच्याशी जोडून घेईल अशी सोपी आहे. लहान-थोरांनी जरूर वाचावा असा हा संग्रह आहे.

।। विवेक वंजारी ।।