निसर्ग व इतिहासाच्या सानिध्यात शाश्वत शिक्षणासाठी...

21 Apr 2025 19:00:00



निसर्ग व इतिहासाच्या सानिध्यात शाश्वत शिक्षणासाठी... 

'धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची' हे शिवराज पिंपुडे लिखित नवे पुस्तक जून २०२४मध्ये प्रकाशित झाले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ अत्यंत सुरेख आणि बोलके आहे. पुस्तकाची मांडणी आकर्षक व सुटसुटीत आहे. प्र. के. घाणेकर यांची प्रस्तावना ही ऋषीतुल्य आशीर्वाद वाटावा अशी अभ्यासपूर्ण आहे. १४० पानांचे हे छोटेखानी पुस्तक एकूण ११ प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. या पुस्तकातील देवराई, पक्षी निरीक्षण, आकाश निरीक्षण, जंगल, समुद्र अशा प्रकरणांमध्ये निसर्गाच्या रचनांचा कुतूहलाने भरलेला प्रवास आहे आणि दुसऱ्या बाजूस गड, मंदिरे, वारसा स्थळे, वीरगळ, लेणी आणि दुर्ग मोहिमा अशा मानवी संरचनांची सौंदर्य स्थळे आहेत. निसर्ग निर्मिती आणि मानवी संरचना यांचा सुंदर मिलाफ वाचकांना समृद्ध अनुभव देतो. प्रत्येक प्रकरण एका संपन्न व अभ्यासपूर्ण उपक्रमाची उद्दिष्ट्ये, रचना, नियोजन, अंमलबजावणी आणि फलनिष्पत्ती याची समग्र मांडणी करते. हे लहानसे पुस्तक फार मोठे विषय आणि शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा आशय आपल्या कवेत घेऊन वाचकांसमोर येते.

लेखक शिवराज पिंपुडे यांची लेखनशैली संवादी आहे. फार तत्त्वज्ञान न पाजळता, ते थेट विद्यार्थ्यांसोबतचे वर्गातील व वर्गाबाहेरील संवाद लिहितात. त्यातून मुलांचे प्रश्नं, निरीक्षणं, कुतूहल, आनंद, नवे शोध-बोध आणि बरच काही सांगतात. त्यामुळे वाचकांच्या पदरात आवश्यक ते सत्त्व पडते.

आता बदलत्या काळात शैक्षणिक प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात बदलावी लागणार होती. तसे संकेत अनेक वर्षापासून मिळत होते. त्याची परिणती म्हणून लागू झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे होय. पिंपुडे यांच्या यापूर्वीच्या 'अन् पारिजातक हसला' या पुस्तकामधील आणि 'धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची' या नव्या पुस्तकातील सर्वच उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० धोरणांची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्याचे मार्ग आहेत.

या कामी शिवराज पिंपुडे लिखित 'धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची'सारख्या पुस्तकांची आपल्याला फार मोठी मदत होईल. केवळ ज्ञान नाही, तर दृष्टिकोन देणारी अशी पुस्तके संवेदनशील, सृजनशील आणि वैज्ञानिक वृत्तीचे विद्यार्थी निर्माण करण्यात मोलाचे योगदान देतील.

।। डॉ. वैभव ढमाळ ।।

Powered By Sangraha 9.0