लेखक शिवराज पिंपुडे यांची लेखनशैली संवादी आहे. फार तत्त्वज्ञान न पाजळता, ते थेट विद्यार्थ्यांसोबतचे वर्गातील व वर्गाबाहेरील संवाद लिहितात. त्यातून मुलांचे प्रश्नं, निरीक्षणं, कुतूहल, आनंद, नवे शोध-बोध आणि बरच काही सांगतात. त्यामुळे वाचकांच्या पदरात आवश्यक ते सत्त्व पडते.
आता बदलत्या काळात शैक्षणिक प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात बदलावी लागणार होती. तसे संकेत अनेक वर्षापासून मिळत होते. त्याची परिणती म्हणून लागू झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे होय. पिंपुडे यांच्या यापूर्वीच्या 'अन् पारिजातक हसला' या पुस्तकामधील आणि 'धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची' या नव्या पुस्तकातील सर्वच उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० धोरणांची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्याचे मार्ग आहेत.
या कामी शिवराज पिंपुडे लिखित 'धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची'सारख्या पुस्तकांची आपल्याला फार मोठी मदत होईल. केवळ ज्ञान नाही, तर दृष्टिकोन देणारी अशी पुस्तके संवेदनशील, सृजनशील आणि वैज्ञानिक वृत्तीचे विद्यार्थी निर्माण करण्यात मोलाचे योगदान देतील.
।। डॉ. वैभव ढमाळ ।।