माणूस व्हायला लावणा-या कथा

शिक्षण विवेक    22-Apr-2025
Total Views |



माणूस व्हायला लावणा-या कथा 

तुम्हाला अकबर-बिरबलाच्या गोष्टी माहिती आहेत का? हो, त्याच बिरबलाच्या हुशारीच्या गोष्टी. एखादी समस्या आली की तिला सामोरं कसं जायचं, हे सांगणाऱ्या अशाच कथा वाचायच्या असतील तर शकुंतला फडणीस यांचा 'सोन्यासारखी संधी' हा कथासंग्रह वाचायला हवा. तुम्हाला एखादी सोन्यासारखी संधी मिळाली, तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्या संधीचा फायदा घ्याल की सोडून द्याल? हे तुम्हाला त्या वेळी ठरवावं लागेल. अशा अनेक संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. तशाच एका चालून आलेल्या सुवर्णसंधीबद्दल 'सोन्यासारखी संधी' या कथेत सांगितले आहे.

आपण एका समाजात राहत असतो. ज्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात. मग एवढ्या साऱ्या लोकांच्या समाजात राहताना आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करावं लागतं. एकमेकांशी वागताना प्रेमानं, सौजन्यानं वागायचं असतं. तुम्ही जर प्रेमानं, नम्रतेनं वागलं नाही, तर इतर लोकंही तुमच्यासोबत चांगलं वागणार नाहीत. तुम्हाला कुणी मदत करणार नाही. एकमेकांच्या सहकार्यानेच आपण पुढे पुढे जाऊ शकतो. याचे महत्त्व सांगणारी 'कोनाड्याचा मालक' ही कथा यात आहे.

यासोबतच आपल्याला घरी चांगलं खायला मिळत असतं. पण चमचमीत खाण्याची सवय लागली की आपण कसं सारखं त्याच्या मागे जात राहतो, पण ते आपण रोज खाऊ शकत नाही. हे सांगणारी 'पारणं' ही कथा वाचण्यासारखी आहे.

एक धनाढ्य माणूस त्याच्या सेवकांचा छळ करत असतो आणि मग त्यातून मार्ग काढताना एका सेवकाने दाखवलेली हुशारी 'ओयोय घ्या ओयोय!' या कथेत दिसून येते.

सगळं काही असल्यावर किंवा काही नसल्यावरही आपण माणूस म्हणून इतरांना कशी वागणूक देतो. हे शिकवणाऱ्या व चांगली नीतिमूल्ये रूजवणाऱ्या या कथा आहेत.

।। विवेक वंजारी ।।