प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार असतो: प्राचार्य श्याम भुर्के

शिक्षण विवेक    25-Apr-2025
Total Views |


प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार असतो: प्राचार्य श्याम भुर्के 

 
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार असतो: प्राचार्य श्याम भुर्के

पुणे : जीवन सुंदर असून उत्तमरीत्या ते जगावं दुसऱ्यांना मदत करावी, हसत खेळत राहावं असे सांगत व्यक्तिमत्त्वाचे धडे देत “प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार असतो,” असे प्रतिपादन प्राचार्य श्याम भुर्के यांनी केले. डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या सकाळ व दुपार मराठी विभागाच्या वतीने दिनांक २३ व २४ एप्रिल २०२५ रोजी आयोजित दोन दिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ व्याख्यानामध्ये ते बोलत होते. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, पर्यवेक्षिका राधा केतकर मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना चांगली कथा लिहिता, सांगता यावी. सभेत त्यांना धीटपणे बोलता यावे, त्यांच्यातील वक्तृत्व कलेला चालना व व्यासपीठ मिळावे. व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण व्हावी या हेतूने आयोजन केले होते.

या व्याख्यानामध्ये श्याम भुर्के यांनी विद्यार्थ्यांना कथा कशी लिहायची, कशी सांगायची, सभेत कसे बोलायचे, आलेल्या संधीचे सोने करून नेहमी सकारात्मकतेने ‘हो’ म्हणायचे, अभ्यास व व्यायाम करायचा, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून यश कसे मिळवायचे हे सांगितले. शिवाय पुणे शहराचे महत्त्व सांगून महान साहित्यिक, कर्तबगार लोकांचे संदर्भ दिले. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रेरणादायी कथा सांगितल्या. प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची स्वाक्षरी घेतली. व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया जोशी, पर्यवेक्षिका राधा केतकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून श्याम भुर्के यांच्या व्याख्यानाचे महत्त्व सांगितले. श्याम भुर्के यांचा परिचय व सूत्रसंचालन राघवेंद्र गणेशपुरे यांनी केले. प्राची कुलकर्णी, कांचन सोलापूरकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.