पुणे : येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळा व साने गुरुजी संस्कार साधना संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या सभागृहामध्ये आज दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे निमंत्रित कवी, विद्यार्थी व शिक्षक असे कवी संमेलनाचे स्वरूप होते.
निमंत्रित प्रमुख कवीमध्ये डॉ.संगीता बर्वे, गायक व संगीतकार राजीव बर्वे, गायिका कु. प्रांजली बर्वे, मृणाल जैन, डॉ दिलीप गरुड, अलका पुराणिक, दत्ता चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, पर्यवेक्षिका राधा केतकर आधी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका विजया जोशी व राधा केतकर यांच्या हस्ते निमंत्रित कवींचा श्रीफळ व ग्रंथ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजया जोशी यांनी केले. डॉ.दिलीप गरुड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त लेखिका व कवयित्री डॉ.संगीता बर्वे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. निमंत्रित कवी, विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांनी विविध विषयांवर कवितांचे सादरीकरण केले. यात विश्व,देश, राष्ट्र, समाज, शौर्य, प्रेम, समता, मानवता,निसर्ग, मराठी भाषेवरील प्रेम, उज्ज्वल भारत, भक्तिभाव, संगीतातील रागाचे महत्त्व शिवाय वास्तव परिस्थितीला लक्षात ठेवून सकारात्मकतेचा संदेशही या कवी संमेलनाच्या माध्यमातून देण्यात आला. विद्यार्थी बालकवींमध्ये आद्या योगेश कुलकर्णी, सर्वेय तुषार देशमुख, ओवी सतीश दोशी, गार्गी मंदार निजामपूरकर, सई आनंद सहस्त्रबुद्धे तर शिक्षक- शिक्षिका कवींमध्ये पूर्वा आपटे,अमिता खजुरे, ईशा लिखिते, राधा केतकर,कांचन सोलापूरकर, राघवेंद्र गणेशपुरे यांनी कवितांचे सादरीकरण केले. मान्यवर कवींच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांना साने गुरुजी संस्कार साधना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. निमंत्रित कवींचा परिचय व सूत्रसंचालन राघवेंद्र गणेशपुरे यांनी केले. प्राची कुलकर्णी यांनी आभार मानले. कु.प्रांजली बर्वे यांच्या ‘वंदे मातरम’ या गीताच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीतेसाठी विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात मराठी विभाग, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.