नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सर्व ? खूप उत्साहात असाल ना ? कारण आता शाळेला मोठी सुट्टी सुरू होईल. सर्वांना सुट्टीत धमाल करायची असेल ना? मात्र, उन्हाळा म्हटलं की आपल्याला कडकडते ऊन आणि घामाच्या धारा आठवतात. बरोबर ना? पण तुम्ही अजिबात घाबरू नका. या उन्हाळ्यात तुम्हाला उन्हाचा त्रास न होता आणि आजारी न पडता भरपूर धमाल करता यावी, यासाठी मी काही सोप्या टिप्स घेऊन आले आहे.
तुम्हाला माहितीच असेल की, आपल्या शरीरातील सर्वांत जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. आपण जे पाणी पितो ते आणि जे शरीरातील वेगवेगळ्या क्रियांमध्ये शरीरात तयार होते तेही ! या पाण्याची पातळी शरीरात योग्य प्रमाणात राखली जाणे अत्यंत आवश्यक आहे.
उन्हाळ्यात पाणी पिणे गरजेचे असते, हे तर तुम्हाला माहीत आहेच. किमान तीन लीटर पाणी दिवसभरात तुमच्या पोटात जाणे गरजेचे आहे, हेही तुम्हाला माहीत असेल. मात्र, आज मी अशी एक युक्ती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात की नाही, हे समजू शकेल.
सकाळी उठल्यावर जेव्हा पहिल्यांदा लघुशंकेसाठी जाता तेव्हा लघवीचा रंग पाहा. तो जर लिंबासारखा किंवा पिकलेल्या आंब्यासारखा दिसत असेल, तर तुम्ही जितके पाणी पीत आहात तितके पुरेसे आहे. लघवीचा रंग जर संत्र्यासारखा किंवा त्याहून गडद दिसत असेल, तर समजून जा की, तुमचे डिहायड्रेशन होते आहे.
म्हणजेच तुम्ही पीत आहात तेवढे पाणी पुरेसे नाही. असे असल्यास दिवसभरात किमान अर्धा ते एक लीटर पाणी जास्त प्या आणि नेहमीच सकाळी उठल्यावर सर्वांत आधी एक ग्लास पाणी प्या.
उन्हाळ्यात लघवीचे प्रमाण कमी होते, हे खरे असले तरीही त्या प्रमाणावरूनही तुम्हाला समजू शकते की,तुम्ही पीत असलेल्या पाण्याची मात्रा वाढवण्याची गरज आहे की नाही.
दिवसभरात किमान तीन ते चार वेळा लघवीसाठी जावे लागत असेल, तर तुम्ही जितके पाणी पीत आहात ते पुरेसे आहे. मात्र तीनपेक्षा कमी वेळा लघवी होत असेल, तर मात्र तुम्ही आणखी पाणी पिण्याची गरज आहे, असे समजा. आवडली ना युक्ती ? नक्की करून पाहा.
आणखी काही टिप्स देते.
उन्हाळ्यात शक्यतो दुपारी बारा ते तीन या दरम्यान घराबाहेर पडू नका. उन्हात खेळू नका. बाहेर जाणे अगदीच गरजेचे असेल तर डोक्याला स्कार्फ बांधून निघा किंवा कॅप/हेंट/छत्री वापरा. सनस्क्रिन लावायला विसरू नका. पाण्याची बाटली नेहमी जवळ बाळगा. तहान लागो अथवा न लागो, दर अर्ध्या ते पाऊण तासाने थोडेथोडे पाणी पीत रहा.
उन्हाळ्यात जी रंगीबेरंगी फळे विक्रीसाठी येतात, ती सर्व फळे म्हणजेच सिझनल फ्रुट्स, भरपूर जीवनसत्त्वे असणारी असतात. ही फळे खाण्याने वर्षभर रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राहते. या काळात वेगवेगळ्या बेरीजसुद्धा येतात, ज्यात खूप अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तब्येत उत्तम राहते. संत्री, स्ट्रॉबेरी, कलिंगड, मोसंबी, आवळा अशी सर्व फळे खा. आणि हो, आंबे बेताने खा बरं! कारण, आंबे कितीही गोड लागले आणि तुम्हाला कितीही आवडले तरी ते उष्ण असतात. खाण्यापूर्वी दोन तास आंबे पाण्यात पूर्ण बुडवून ठेवा. असे केल्याने त्यातली उष्णता निघून जाते आणि ते बाधत नाहीत.
उन्हाळ्यात सगळ्यांत जास्त पोटाच्या समस्या आणि तक्रारी उद्भवतात. पोट बिघडणे, ऍसिडिटी होणे, गॅसेस होणे, अपचन, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या उन्हाळ्यात होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढावेत यासाठी दही आणि ताक या दोन्ही गोष्टी आहारात जरचेवर घेत राहा. शिवाय यासोबतच काकडी, गाजर यांची कोशिंबीरसुद्धा खा. दूध कमी प्रमाणात च्या. कारण, ते पचण्यास जड असते.
जेवण नेहमी वेळेवर करा. रात्री उशिरापर्यंत जागू नका. सकाळी लवकर उठा. रात्रीचे जेवण शक्यतो आठ वाजेपर्यंत उरकून घ्या. जेवणानंतर किमान एक तास झोपू नका. हे दोन्ही वेळच्या जेवणासाठी महत्त्वाचे आहे.
जेव्हा खूपच डिहायड्रेशन जाणवेल, तेव्हा कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, ताक, लस्सी, फळांचा थंड रस अशा पदार्थांचे सेवन करा.
मला खात्री आहे की, टीप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुमचा उन्हाळा खूप सुखाचा जावो, अशा माझ्या शुभेच्छा !
Stay Healthy, Stay Blessed
।। दीप्ती काबाडे ।।