परवा मैत्रीण भेटली, खूप दिवसांनी भेटल्यामुळे बोलत होती. पर-संसार, ऑफिस-मुलं एकेक विषय गप्पांमधून पुढे बेत होता. नेहेमीसारखी तिची चिडचिड ऐकू आली नाही. मजेत होती ती. 'तू इतकी निवांत, मजेत कशी पं ?' भी हळूच प्रश्न केला; तर ती पटकन म्हणाली, 'पोरांना शिबिरात टाकलंय!' मी म्हटले, 'शिबिरात ?' तर ती म्हणाली, 'अगं, आता सुट्या लागल्या... उन्हाळ्याची मोड्डी सुट्टी फार कटकटीची असते बाई.' मी विचारलं, 'मजेचा, आनंदाचा सुट्टी हा विषय कटकटीचा कसा बाटतो?' तिची सुट्टीविषयीची चिडचिड पूर्णपणे तिच्या आवाजात उतरली, म्हणाली, 'सुट्टी आपल्याला मिळाली तर मस्त गं, पण पोरांना ?'
'त्यात एक-दोन दिवस ठीक आहे गं, पण ही मोड्डी सुट्टी उन्हाळ्याची! नुसता चैताग असतो... उच्छाद मांडतात अक्षरशः. सुट्टीच्या दिवशी आपल्या दुपारच्या झोपेचं खोबरं... बाहेर खेळा म्हणता येत नाही; कारण बाहेर रणरणतं उन्ह, आजारपण कोण काढील बाई!' मैत्रीण धो घो बोलत होती, धबधब्यासारखं! मी अवाक् होऊन फक्त ऐकत होते.
'शिबिरात टाकलंय' हे ऐकून तर त्या मुलांच्या रूपात बागडणारी वासरं कोंडवाड्यात कोंडल्यासारखी दिसू लागली. माझा जीव कळवळला. मी म्हटलं, 'अगं, उन्हाळ्याच्या सुट्टीची तू वाट लावलीस.' मैत्रिणीने काढता पाय घेतला. ती म्हणाली, 'चल निघते मी. अजून बरंच शॉपिंग राहिलंय.' ती गेली आणि मी विचार करू लागले. मोठी सुट्टी पालकांना कटकटीची कशी वाटते कोण जाणे? स्वतःची सुटका करून घेण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात डांबणाऱ्या पालकांसाठी समुपदेशन शिबिर आयोजित करावं असं वाटलं.
'सुट्टीत काय काय करायचं! आपण सगळ्यांनी ठरवायचं!' अशी कविता माझ्या मनात फेर धरते. अगदी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत! यातला 'सगळ्यांनी मिळून ठरवायचं' हा विचार मनाला खूप भावतो. परीक्षा संपल्याबरोबर सूरपारंब्या, आट्यापाट्या, सागरगोट्या, ठिक्करपाणी हे खेळ कोणे एके काळी होते, असं सांगण्याची पाळी आता पालकांवर आलीय. खरं म्हणजे याला पालकच जबाबदार, 'तिळा तिळा दार उघड'च्या शैलीत इंटरनेटवरचा खजिना शोधण्यात किंवा व्हिडीओ गेम्स खेळण्यात मुलं हरवून जातात. आई, आजी-आजोबा टीव्हीवरच्या मालिकेत किंवा व्हाट्सॅपवर गुंतलेले असतात. वडील ऑफिसात किंवा व्यवसायात गुरफटलेले असतात. संवादाचा अभाव असलेल्या घरांमध्ये सुट्टीचा आनंद घ्यायला वाव नसतो. जाहिराती पालकांना भुरळ घालत असतात. व्यक्तिमत्त्व विकास १५-२० दिवसांत कसा का घडून येतो कोण जाणे?
मुलांची मोठी सुट्टी म्हणजे वैतागवाडी न मानता, ती एक छान संधी आहे, असं पालकांना वाटायला हवं. पैसे भरून संस्कार विकत घेता येत नाहीत. पालकांच्या आचरणातून मुलांच्या मनावर नकळत ते होत असतात. पालकांचा सहवास मुलांना हवाहवासा असतो. त्यासाठी पर्यटनाला जाणं, सहलीला जाणं आवश्यक आहेच; पण पर्यटन, सहल म्हणजे भरभरून शॉपिंग करणं नव्हे. पर्यटनाचं सौंदर्य, निसर्गाची विविध रूपं, भौगोलिक विशेषता, लोकसंस्कृती यांविषयी मुलांच्या मनात कुतूहल जागृत करता येतं. छोट्या छोट्या वह्यांमध्ये माहिती टिपणं, सहलींवरून आल्यावर त्याविषयी सगळ्यांनी मिळून चर्चा करणं, पाहिलेल्या विविध गोष्टींची मित्र-मैत्रिणींना माहिती देणं, वर्णन करणं यात मुलांचा वेळ छान जातो. पुस्तक प्रदर्शनांना भेट देऊन आवडीची पुस्तकं परस्परांमध्ये वाटून घेता येतात. अमुक विषयावर वाचा, असा आग्रह न धरता मुलांना ज्या विषयाची आवड असेल, त्याविषयीच्या वाचनाची गोडी मुलांना लावता येते. अवांतर वाचन करण्याची संधी मोठ्या सुट्टीत मिळते. खेळाचे कितीतरी प्रकार मुलांना शिकवता येतील. गाण्यांच्या भेंड्या, गावांच्या नावांच्या भेंड्या, याबरोबरच सुभाषितं, कविता, म्हणी, वाक्प्रचारांचे खेळ खेळता येतात. शब्दसंग्रह, सामान्यज्ञान नकळत वाढवणाऱ्या गमती-जमती सुट्टीत करता येतात. चित्रकला, संगीत, नाटक इ. कला शिकणं आणि छंद जोपासणं, यासाठी मोठ्या सुट्टीचा उपयोग होतोच. पण हे सगळं करताना मुलांना शिबिरात डांबण्याची गरज नाही.
सहलीला जाण्याचं ठरलं की, सहलीच्या नियोजनात मुलांचा सहभाग अवश्य हवा. त्यांच्यावर छोट्या छोट्या कामांची जबाबदारी टाकून, त्यांच्यावर विश्वास दाखवला की मुलांना खूप आनंद होतो. प्रवासात घेण्याच्या वस्तूंची यादी तयार करणं; स्वतःची बॅग स्वतः भरणं; प्रवासाचा मार्ग कुठून कुठपर्यंत, तो प्रदेश, ते रस्ते, मुक्कामाची ठिकाणं, तिथे आपण काय पाहणार आहोत, हे पालकांनी मुलांना बरोबर घेऊन ठरवलं, तर त्यांना नकळत उत्कृष्ट व्यवस्थापनाची सवय लागते. याशिवाय नकाशावाचनाची गोडी लागते. सुट्टीतला वेळ मजेत जातो. काही मुलांना चिकटवही तयार करण्याची आवड असते. त्यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत बसलं, तर मुलांना अधिक आनंद मिळतो. अगदी बालवर्गातल्या मुलांपासून ते माध्यमिक शाळेतल्या मुलांपर्यंत कितीतरी गोष्टी पालकांना घरीच शिकवता येतात. माझी भाची सुट्टीत घरी आली होती, नुकतीच लिहायला-वाचायला शिकलेली. मामी-मामी करत माझ्या मागे फिरत असे. रांगोळी घालायला गेले की, मी तिलाही सहभागी करून घेई. रंग भरायला सांगे. एकदा किराणा सामान डब्यांमध्ये, बरण्यांमध्ये भरत होते; तर ती उत्सुकतेने माझ्याजवळ आली. मग मी तिला कागद दिले, रंगीत पेन आणि चिकटवण्यासाठी गमची ट्यूब दिली. तिला सांगितलं की, कागदाचे नीट चौकोनी तुकडे कर. तुझ्या अक्षरात धान्याचं, पदार्थांचं नाव लिही आणि त्या त्या डब्यांना, बरण्यांना चिकटव. तिला खूप आनंद झाला. तिची दुपार मजेत जाऊ लागली. शेंगदाणे, तूरडाळ, साबुदाणा रंगीबेरंगी अक्षरांत लिहून तिने ते कागद चिकटवले.
नियोजनात शेजारच्या आजींच्या नातवाने आजीला कॉम्प्युटरची, मोबाईलची माहिती शिकवली. आजी आता स्वतः ई-मेल करतात. मोबाईलवर मेसेज टाइप करतात.
खरं सांगू, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आपला सहवास मिळाला की, खऱ्या अर्थानं सुट्टी एन्जॉय करता येते. त्यासाठी सर्वांनी मिळून सुट्टीत काय करायचं, हे ठरवू या !
'सुट्टीत काय काय करायचं, आपण सर्वांनी ठरवायचं । सारेगमपधनिसा, जाऊ सप्तसुरांच्या देशा, गाण्यात आपण रमायचं सुरेल गाणं शिकायचं । जपू या साक्षरतेचा मंत्र, शिकू या विज्ञानाचं तंत्र, ज्ञान आपलं वाढवायचं पुस्तक नि पुस्तक वाचायचं ।'
डॉ. प्रतिमा विश्वास