राष्ट्रभक्तीचे धडे देणारे संस्कार केंद्र श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय- सोमयजी मुंडे (पोलीस अधीक्षक, लातूर) यांचे प्रतिपादन!

17 Jun 2025 17:15:26


श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय 

राष्ट्रभक्तीचे धडे देणारे संस्कार केंद्र श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय- सोमयजी मुंडे (पोलीस अधीक्षक, लातूर) यांचे प्रतिपादन!

लातूर; (प्रतिनिधी). १६ /०६ /२०२५

श्री केशवराज प्राथमिक विद्यालय लातूर येथे ढोल ताशाच्या गजरात व औक्षण करून नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दारामध्ये रांगोळी काढून, दारावरती आंब्याचे तोरण बांधून, नारळाच्या झावळ्या व फुगे लावून,सुंदर व आकर्षक असे फलक लेखन करून सजून सज्ज होती. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणजे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय जी मुंडे हे उपस्थित होते. त्याबरोबर शैलेश जी कुलकर्णी (स्थानिक समन्वय समिती कार्यवाह, लातूर) शाळेचे मुख्याध्यापक विष्णूजी सोनवणे हे ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,परिचय व स्वागत गवळी सर यांनी करून दिले. त्यानंतर वैयक्तिक पद्य मीराताई इंगोले यांनी 'चंदन है इस देश की माटी' हे घेतले. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा विद्यारंभ घेण्यात आला व शासनातर्फे प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर सोमय जी मुंडे यांनी विद्यार्थ्यांना शाळा म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याचे, आनंद घेण्याचे व राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे ठिकाण आहे असे सांगितले. तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचा सर्वांनी आनंद घ्यावा असेही त्यांनी बालचिमुकल्यांना सांगितले व सर्वांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शैलेशजी कुलकर्णी व मुख्याध्यापक विष्णूजी सोनवणे सर यांनीही बाल चिमुकल्यांना शाळेच्या पहिल्या दिवसासाठी व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर आज शाळेत सर्वांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्ग शिक्षकांनी वर्गामध्ये औक्षण करून स्वागत केले व नवीन मुलांना फुलं व पेढा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे ऋणनिर्देश गवळण ताई काजगुंडे यांनी केले तर कल्याण मंत्र व सूत्रसंचालन दिपालीताई आकनगिरे यांनी केले.

Powered By Sangraha 9.0