'फुले लाजतात' हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला पुढील साहित्य हवं आहे
१२ निशिगंधाची फुलं, ४ काचेच्या बाटल्या, छोटा चाकू किंवा कात्री, निळी शाई, लाल व हिरवा खाण्याचे रंग, चमचा.
तर करा सुरू :
चारही बाटल्यात योग्य तेव्हढे पाणी भरा. पहिल्या बाटलीत निळ्या शाईचे दहा थेंब टाका व ढवळा. दुसऱ्या बाटलीत लाल रंग घालून ढवळा. तिसऱ्या चाटलीत हिरवा रंग घालून ढवळा. आता फुलांच्या फांदीच्या तळाशी दोन सेंमी. अंतरावर तिरका छेद घ्या. प्रत्येक बाटलीत ३-३ फुले ठेवा. आता चार तासांनी गंमत पाहा. सर्व बाटल्यातील फुले इतकी लाजतील.. इतकी लाजतील की... आता त्या सर्व फुलांचे रंगच बदललेले असतील.
हे असं का होतं :
मुळावाटे शोषलेले पाणी पानापर्यंत पोहोचवणे हे काम वनस्पतीमधील सूक्ष्म नलिका करतात. बाष्पीभवन व केशाकर्षण या दोन तत्त्वांचा वापर करून बाटलीतले रंगीत पाणी गुरुत्वाकर्षणावर मात करून झाडाच्या सर्व भागात पोहोचते आणि ही बाटलीतली पांढरी फुले रंगीत होतात.
म.. मजा :
प्राचीन काळी हुनान प्रांतातल्या शोधचुंबक मुलांनी फुलांप्रमाणेच झाडांवरही प्रयोग केले. तेव्हा त्यांना कळलं की काही मोठी झाडे उन्हाळ्यात दिवसाला ९०० लीटर पाणी शोषतात. तेव्हापासून हे मुलांचे वनस्पती शोध उद्योग पाहून 'पाणी पायाने प्या किंवा तोंडाने ते शरीरावर दिसतंच' ही चिनी म्हण रूढ झाली.
राजीव तांबे