आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत व पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानेल जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे. असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात. त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली आहे.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे' अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरू शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आजमितीपर्यंत. भारतीय गुरू परंपरेत गुरू-शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्कय, शुक्राचार्य-जनक, कृष्ण सुदामा, संदीपानी, विश्वामित्र-राम-लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरू शिष्यांची परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. अशाच थोर गुरुंपैकी मी परमपूज्य परशुराम-कर्ण या गुरू शिष्याची गोष्ट तुम्हाला सांगत आहे.
परशुरामांना विविध विद्या अवगत होत्या. त्यांतील काही देवांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्या प्राप्त करण्याच्या हेतूने व अजिंक्य योद्धा होण्यासाठी कर्ण परशुरामांच्या आश्रमात आला. परशुराम क्षत्रियांना विद्या शिकवत नसत. म्हणून कर्ण ब्राह्मण वेषात तेथे राहू लागला. तो आश्रमातील सर्व कामे करत असे. परशुरामांची कामे त्याला अत्यंत प्रिय होती. कर्ण नम्र असल्यामुळे हळूहळू कर्णाने आपल्या गुरुंचे देखील मन जिंकले. तो कित्येक विद्यांमध्येही पारंगत झाला. एके दिवशी परशुराम पर्णकुटीच्या बाहेर अंगणात बसलेले असताना कर्ण तेथे आला. आपल्या गुरूंना झोप आलेली पाहाताच त्याने गुरूंना विनंती केली की, 'गुरूवर्य आपण येथेच पडावे.' त्याने परशुरामांचे डोके आपल्या मांडीवर घेतले तो त्यांना बारा घालू लागला. गुरूंना चांगली झोप लागली. थोड्या वेळाने एक भुंगा तेथे आला व परशुरामंच्या अंगावर बसू लागला. कर्णाने त्याला खूप वेळा हुसकावून लावले. पण तो भुंगा पुन्हा पुन्हा येऊन परशुरामांच्या अंगावर बसू लागला. शेवटी त्याला तेथे जागा न मिळाल्यामुळे तो कर्णाच्या मांडीवर बसला व त्याची मांडी पोखरू लागला, कर्णाच्या मांडीमधून रक्त वाहू लागले. खूप वेदना होऊनही गुरूंची झोप मोड होऊ नये म्हणून कर्ण वेदना सहन करत राहिला.
थोड्या वेळाने परशुरामांना जाग आली. त्यांनी हे दृश्य पाहिले. ते कर्णाला म्हणाले, 'तू कोण आहेस? तू ब्राह्मण नाहीस. अशा वेदना केवळ एक क्षत्रियच सहन करू शकतो. तुझे खरं नाव काय आहे? मग कर्णाने आपले नाव सांगितले व आपले येण्यामागचे कारण सांगितले. हे ऐकून परशुरामांना खूप राग आला. त्यांनी कर्णाला सांगितले की, तू खोटं बोलून माझ्याकडून या विद्या प्राप्त केल्या आहेस म्हणून मी तुला शा देतो की, जेव्हा तुला सगळ्यात जास्त या विद्येची गरज असेल, त्या वेळी तुला या विद्येचे विस्मरण होईल.
कर्णाने परशुरामची क्षमा मागितली व म्हटले,' माझ्या जागी दुसरी कोणी व्यक्ती असती तर तिने देखील हेच केले असते. कारण तुम्ही केवळ ब्राह्मणांनाच शिष्य म्हणून स्वीकारत. कर्णान पुन्हा एकदा गुरूंची क्षमायाचना केली. तेव्हा परशुरामांना त्याची दया आली. त्यांनी कर्णाला 'विजयाअस्त्र' व 'भार्गवअस्त्र' ही दोन अस्त्रे दिली.
या प्रसंगावरून गुरू-शिष्याचे नाते किती मोठे असते हे कळते.
अमिता पाटोळे