मूल्य संस्कारांची जोपासना हेच खरे गुरुपूजन!

11 Jul 2025 14:34:12

न्यु इंग्लिश स्कूल रमणबाग
 
न्यु इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 36 वर्गांमध्ये वर्गश: गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करण्यात आला. मूल्य संस्काराची जोपासना करणे हेच खरे गुरुपूजन असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी गुरुजन आणि आई-वडिलांचा सदैव आदर करणे जरुरी आहे, असे प्रतिपादन प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केले. प्रशालेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा' हे गीत  हर्षद गाडगीळ सरांच्या मार्गदर्शनाने सादर केले.
वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्रे, गुरुस्तवन करणारी काव्य, मजकूर यांची भित्तीपत्रके तयार केली होती.
कोणतेही साहित्य विकत न आणता, आई,वडील तसेच गुरुजन यांचा सन्मान, गौरव करणे ही कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी चित्रांतून देखील आपल्या गुरुपौर्णिमा शुभेच्छा प्रदान केल्या. तर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन गुरुपौर्णिमा तसेच गुरुजनांविषयी विचार व्यक्त केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून दिन विशेष विभाग प्रमुख राधिका देशपांडे यांनी उपक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजूषा शेलूकर यांनी मार्गदर्शन केले होते.
सर्व शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पालक संघाच्या वतीने गुलाबाची रोपे देऊन गौरवण्यात आले. उपशिक्षक हेमंत पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Powered By Sangraha 9.0