मुलांना घडविणारे शिक्षक: ॲडव्होकेट मुरलीधर कचरे
पुणे: “ ईश्वर-निसर्ग, आई -वडील, शिक्षक, समाज हे आपले गुरु असून विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक आहेत” असे प्रतिपादन ॲडव्होकेट मुरलीधर कचरे यांनी केले. दिनांक १२ जुलै २०२५ रोजी टिळक मार्ग येथील गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या एस.एस.सी बोर्डातील गुणवंत व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, शिक्षिका काजल चौधरी, पालक संघांच्या उपाध्यक्षा आसावरी कुलकर्णी, अभिजीत शिराळकर आदी उपस्थित होते.
कार्यकमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. भक्ती पटवर्धन, धिवार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गुरुवंदना गीत सादर केले. प्रास्ताविक विजया जोशी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय राधा केतकर यांनी करून दिला. विजया जोशी यांच्या हस्ते मुरलीधर कचरे यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुरलीधर कचरे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवताना दररोज एक तास मैदानात खेळण्याचे व व्यायाम करण्याचे सांगितले. खेळ व व्यायाम केल्याने जीवन आनंदी होणार असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
पालक सभेच्या माजी उपाध्यक्षा अदिती जोशी यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पाचवी, सातवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. एस.एस.सी बोर्डामध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या एकूण शहाण्णव गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. शिक्षक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीचे वाचन केले. सूत्रसंचालन वंदना विसपुते यांनी केले. आसावरी कुलकर्णी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, टिळक रोड, पुणे ३०