दिनांक 1 जुलै 2025
एच.ए. स्कूल प्राथमिक विभागात विविध कार्यक्रमांनी कृषी दिन साजरा!
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजेच कृषी दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे व विद्यार्थ्यांच्या हस्ते शेतीच्या विविध अवजारांची पूजा करण्यात आली.
यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी जगाचा पोशिंदा बळीराजा.... हे बालनाट्य सादर केले. यामध्ये भाकरीचा प्रवास दाखविण्यात आला. व यातून अन्नाची नासाडी करू नये, अन्न वाया घालू नये हा संदेश देण्यात आला. बालनाट्याचे लेखन प्रतिभा पोटघन यांनी केले होते.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात तुळस व विविध शोभेच्या झाडांची रोपे लावली व विविध बियांची पेरणी केली. यातून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हा संदेश सर्वांना देण्यात आला. प्रतिभा पोटघन यांनी मुलांना कृषी दिनाची माहिती सांगितली. इयत्ता चौथीच्या रक्षा अंबाडे या विद्यार्थिनीने कांदा मुळा नी भाजी....हा अभंग सादर केला. इयत्ता चौथीच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून कार्यक्रम सादर केला.
शब्दांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर