माझे आवडते शिक्षक

03 Jul 2025 19:00:00


माझे आवडते शिक्षक

लहानपणीचे आपले जग म्हणजे आपले आई-वडील भावंडे, शाळेतल्या बाई आणि वर्गातील मित्र-मैत्रिणी एवढेच मर्यादित असते. ज्या गोष्टी घरी आई-बाबांनी सांगितल्यावर पचनी पडत नाहीत त्याच गोष्टी बाईंनी सांगितल्या की पटकन आत्मसात होतात.

माझी मुलगी तीन महिन्यांची झाल्यावर मला उमगू लागले की, या छोट्याशा जीवाचे संगोपन म्हणजे एक प्रशिक्षणच आहे. स्वतःचे लहानपण आठवू लागले. आई-बाबांनी त्यांच्या आचरणातून, त्यांच्या कृतीतून नकळत केलेले संस्कार लक्षात येऊ लागले.

शाळेतही सगळ्या शिक्षकांमध्ये एखाद्या शिक्षकाचा प्रभाव प्रत्येकावर असतोच. माझ्या सहावी ''च्या वर्गशिक्षिका मीरा दयानंद देसाई यांचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर, जडणघडणीवर खूप मोठा प्रभाव आहे. मराठी, भूगोल आणि शिवण हे त्यांचे आवडीचे विषय. कलाकार असल्याने बाईंचे चित्रकला, विणकाम, शिवणकाम अतिशय सुंदर होते. माझे हस्ताक्षर, तसेच शुद्धलेखन अजूनही चांगले आहे ते देसाई बाईंमुळेच. शिवणासारख्या कंटाळवाण्या विषयामध्येही बाईंनी कल्पकतेने आम्हा मुलींमध्ये आवड निर्माण केली होती.

सहावीत असताना एकही दिवस गैरहजर न राहिल्याबद्दल त्यांनी मला 'फाउंटन पेन' बक्षीस दिले होते. कारणाशिवाय दांडी न मारण्याचा नकळत संस्कार माझ्यावर त्या बक्षिसाच्या पेनमुळे झाला. अगदी दहावीच्या वर्षापर्यंत मी कधीही शाळेत गैरहजर राहिले नाही. तसेच, आता मी स्वतः शिक्षिका असतानाही अगदी गरज असेल, तरच रजा घेते.

त्याच वर्षी आमच्या वर्गातील एक मुलगी बरेच दिवस गैरहजर होती. बाईंनी चौकशी केली की, ती का येत नाही? कुठे राहते माहीत आहे का ? तुम्ही तिला भेटून आलात का? बाईंच्या या प्रश्नांची आमच्याकडे नकारार्थी उत्तरे होती; पण घरी आल्यावर आईला विचारले, तर तिला त्या मुलीचे घर माहीत होते. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघी मैत्रिणी तिच्या घरी गेलो. तिला कावीळ झाल्याचे कळले. तिची विचारपूस केली. तिला आणि तिच्या आईला खूप बरे वाटले. शाळेतला बुडलेला अभ्यास आम्ही तुला देऊ. तू तब्येतीची काळजी घे, असे सांगून आम्ही निघालो. शाळेत आल्यावर बाईंना सांगताना, आपण काहीतरी चांगले काम केल्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाईंना हकिकत सांगितल्यावर त्यांनी शाबासकी दिली.

शिक्षिका असणाऱ्या आमच्या देसाई बाई माझ्या लग्नानंतर 'मामेसासूबाई' झाल्या. लग्नानंतर काही वर्षेमी त्यांना मामीऐवजी 'बाईच' म्हणत होते. शिक्षिक असतानाचा त्यांच्याबद्दल असणारा आदरयुक्त धाक जाऊन आमचे नाते मैत्रिणींचे झाले. मुंबईला माहेरी गेल्यावर गोरेगावला बाईंच्या घरची भेट ठरलेलीच असे.

स्वतःचे मोठे आजारपण असतानाही त्यांच्या यजमानांच्या व मुलाच्या अपघातानंतर अत्यंत धीराने, सर्व नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी परिस्थितीवर मात केली. नातवंडांबरोबर त्यांच्या वयाचे होऊन खेळणे, गप्पा मारणे याचबरोबर त्यांना शिस्त लावण्यातही त्यांचा हातभार होता.

सगळ्यांचे वाढदिवस, मुलांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात ठेवून, त्यांना शुभाशीर्वादाचे फोन त्या करत होत्या.

आमच्या स्नेहसंमेलनासाठी आभारपर काव्यपंक्तीही त्यांनी मला लिहून दिल्या होत्या, पण त्याबद्दलचा अभिप्राय त्यांना फोनवरून सांगण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्याबद्दलची कायमची रूखरूख मला लागली आहे

'बाई' म्हणून त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आणि 'मामेसासूबाई' म्हणून त्यांच्याशी साधलेला संवाद कायमच माझ्या लक्षात राहणार आहे.

माझ्या आवडत्या शिक्षिकेने दिलेला ज्ञानाचा वसा मी असाच पुढे चालू ठेवीन; हीच माझी माझ्या बाईंना आदरांजली !

हर्षाली चेतन अवसरे

शिक्षिका, न्या. रानडे बालक मंदिर

Powered By Sangraha 9.0