गुरुवीण कोण दाखवील वाट?

09 Jul 2025 19:00:00


गुरुवीण कोण दाखवील वाट?

मित्रांनो, गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुंच्या ऋणातून उतराई होण्याचा, त्यांची आठवण काढण्याचा, त्यांचे आभार मानण्याचा दिवस. आपल्याला मोठं करण्यात, आपलं वैचारिक पालनपोषण करण्यात आपल्या आई-बाबा, आजी-आजोबांइतकाच मोठा वाटा असतो तो आपल्या गुरुंचा अर्थात आपल्या शिक्षकांचा. गेल्या काही वर्षांत जसा शिक्षणप‌द्धतीत बदल झाला, तसाच तो शिक्षकांमध्येही झाला. आपण पाहु या का हा बदल कसा होता ते...

'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' हे गाणं तुम्ही ऐकलं असेल ना? शाळा, शिक्षक म्हटलं की आपल्याला आठवतं हे गाणं, 'श्यामची आई' हा आचार्य अत्रे दिग्दर्शित एक नितांतसुंदर चित्रपट मराठीत होऊन गेला, त्यातलं हे गाणं, पन्नास वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती पदकही या चित्रपटाला मिळालं. शालेय जीवनात एकदा तरी आपण हे गाणं ऐकलेलंच असतं.

पूर्वीच्या काळी शिक्षक म्हटलं की, "मोठ्या मोठ्या मिश्शा डोळे एवढे एवढे लाल। दंताजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल। शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम। छडी लागे छम छम विद्या येई घम घम। छम छम छम... छम छम छम...।

हेच चित्र डोळ्यांसमोर यायचं. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारलं, तर ते तुम्हाला हेच सांगतील. शिक्षक म्हणजे कडक शिस्त. हेही समीकरण ठरलेलंच बरं का! आमची आमच्या शिक्षकांपुढे मान वर करून पाहायची हिंमतही नव्हती, असं माझी आई मला नेहमी सांगायची.

पूर्वीची शिक्षणपद्धती ही पाठांतरावर आणि सरावावर भर देणारी होती. त्यामुळे रोज पाढे, वर्ग, घन यांचं पाठांतर, कविता वाचन, त्या कविता चालीत म्हणणं, संस्कृत सुभाषितं पाठ करणं हे सगळं अभ्यासाचाच एक भाग होतं व शिक्षक हे सर्व अगदी आपुलकीने विद्यार्थ्यांकडून करून घेत असत. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे हे सगळं केवळ णांसाठी केलं जात नसे. पण गुण म्हणजेच सर्व काही नाही, बमागे विचार हवा; तोही सर्वांगीण विकासाचा, द्यार्थ्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे धाकात ठेवून त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, असं शिक्षक पाहत असत. तेव्हा परिस्थितीही तशीच होती. आपली जिज्ञासापूर्ती करण्यासाठी आपण पूर्वीच्या काळी पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून होतो आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा पूर्णही होत होती. आजही आपली आई-आजी एखादा हिशोब जेवढ्या वेगाने करतात तेवढ्या वेगाने आपलं कॅल्क्युलेटरही करत नाही. त्यांना आजही लहानपणी शिकलेल्या कविता पाठ असतील. विचारून पाहा हवं तर. या शिक्षकांविषयी मुलांच्या मनात आदरयुक्त भीती असे. ती असायलाच हवी. मुलंही शिक्षकांना जरा घाबरून असत. त्यामुळे काही ठरावीक अपवाद वगळता शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवादाल फार वाव नव्हता. मात्र, पुढे पुढे हे नातं बदलत गेलं.

शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला तो माझ्या म्हणजे तुमच्या आई आणि मावशीच्या पिढीत. आता शिक्षक मुलांच्या अतिरिक्त आवडी-निवडींना महत्त्व देऊ लागले होते. म्हणजे, अगदी मलासुद्धा नाटकासाठी-गाण्याच्या स्पर्धांसाठी शाळेतून प्रोत्साहन मिळायला लागलं.

शाळेत शिक्षक स्वतः आमची तयारी करून घेत त्यासाठी शक्य ती सगळी मदत करत. काही वेळा स्वत: आम्हाला स्पर्धेसाठी दुसऱ्या शाळेत घेऊन जात गंमत साग, त्यासाठी आम्हाला शाळेतून तासाला बसण्यातून सूटही मिळे. तुम्ही आता जे प्रोजेक्ट म्हणजेच वेगवेगळ्या विषयांचे प्रकल्प बनवता, त्याची सुरुवात तेव्हापासून हळूहळू झाली होती. शाळेत शिक्षक स्वतः आमच्याकडून प्रकल्प करून घेत असत. त्यासंबंधी सगळी माहिती देत असत. म्हणजे समजा संत ज्ञानेश्वरांवर प्रकल्प करायचा असेल किंवा त्यांचा एखादा अभंग शिकवायचा असेल, तर त्यांच्या आयुष्यातल्या घटना गोष्टी रूपात सांगात. तो अभंग किंवा त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प कसा लिहायचा तेही दाखवत असत. हे केवळ एक उदाहरण झालं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या काळात झालेला मोठा बदल म्हणजे शिक्षक आणि मुलांमध्ये बदलत चाललेला संवाद. काळासोबत शिक्षक म्हणजे यम न राहाता मित्र व्हायला लागले.

त्यानंतर अवतरलं कॉम्प्युटरचं युग. या कॉम्प्युटरने हळूहळू प्रत्येक क्षेत्रात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. आम्हाला शाळेत कॉम्प्युटर शिकवायला सुरुवात केली, तेव्हा तो अगदी प्राथमिक अवस्थेत होता. काही वर्षांनी इंटरनेट सुरू झालं. आता तुमच्या पिढीत शिकवण्याचा, शिकण्याचा पॅटर्न बदललाय. आपल्या मुलांना पूर्णपणे शिक्षकांच्या स्वाधीन करणारे पालक आज बदललेत. तुमच्यापैकी जवळपास प्रत्येक जण आज खासगी शिकवणीला जातो. त्यामुळे शाळेचं, शाळेतील शिक्षकांचं महत्त्व पूर्वीइतकं राहिलेलं नाही असं चित्र दिसतं. इंटरनेटचं महत्त्व वाढू लागलं आहे. आज घरात जवळपास एकतरी कॉम्प्युटर किंवा स्मार्ट फोन आहे. त्यामुळे इंटरनेट नावाच्या महाजालाचा वापर प्रत्येक जण करत आहे. नवीन इ-लर्निंगचा पर्यायही नव्याने उपलब्ध झाला आहे.

मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे तुमच्या आधीच्या पिढीपर्यंत ज्ञान देणारे एकमेव ते म्हणजे शिक्षक हे समीकरण ठरलेलं होतं. पण आता इंटरनेट, टीव्ही, इ-लर्निंग अशा माध्यमांमुळे माहितीची गंगा तुमच्या घरात आली आहे. पण त्यावर मिळते ती माहिती आणि ज्ञान देतो तो शिक्षक हे कधी विसरू नका. त्यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांचं शिकवण्याचं कौशल्य हे वरील माध्यमांतून मिळणाऱ्या माहितीपेक्षा नक्कीच जास्त आहे. शिक्षक आज तुम्हाला केवळ पुस्तकात असलेलं नाही तर या माध्यमांतून मिळणारंही ज्ञान देत आहेत. उदाहरणार्थ, एखादी रासायनिक प्रक्रिया पुस्तकात वाचल्यानंतर ती प्रत्यक्ष कशी होते, हे आज अनेक शाळांतून पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या आणि यूट्यूबवरील व्हिडिओंच्या माध्यमातून दाखवली जात आहे. पण या ज्ञानासह तुम्हाला शिक्षक देत आहेत ते भान. माध्यमांचा वापर कसा करावा, त्यातलं काय घ्यावं, काय टाळावं याचं हे भान आहे, हे विसरू नका.

मित्रांनो, इथपर्यंत लेख वाचल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? आपल्या आजीची पिढी असो, आईची असो वा आपली असो. काळ बदलला, माध्यमं बदलली, दृष्टिकोन बदलला, तरी एक गोष्ट मात्र तशीच आहे ते म्हणजे शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असणारी कळकळ. त्यांची शिकवण्याची इच्छा, त्यासाठी ते घेत असलेली मेहनत हे आपल्यावरचं ऋण आहे. आपण आपल्या कष्टांतून, प्रगतीतून हे ऋण फेडायचं आहे. त्यानंतरच त्यांच्या कष्टांचं सार्थक होईल.

मृदुला राजवाडे

९९२०४५००६५

Powered By Sangraha 9.0