महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मा. कर्नल जनार्दन रामचंद्र खाडिलकर व कॅप्टन किरण जोशी , शाळेचे हितचिंतक श्री . गोविंद मिश्रीलाल केला , सौ . मुग्धा केला व शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी ताई भाटे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी ध्वजप्रतिज्ञा सांगितली. विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व समूहगीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती रेणुका महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार झाला.
आदित्य गटातील कु. तन्वी मोटे हिने शूरवीर कनकलताची सुंदर गोष्ट सांगितली.शौर्य नाझरे याने तिरंगी झेंड्याची माहिती सांगितली . सौ. शुभांगी आठल्ये यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व उलगडून सांगितले. ‘एक मुष्टी धान्य दान’ या उपक्रमांतर्गत जमा झालेला तांदूळ वनवासी कल्याण आश्रमाला सुपूर्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद, सावरकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतून त्यांच्याविषयी माहिती दिली. तसेच आकर्षक कवायत सादर करून सर्वांचे मन जिंकले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी उपस्थितांचे आभार मानले . या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदी, रंगतदार आणि देशभक्तीने ओथंबलेल्या वातावरणात हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.